बातम्या

कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एन्ट्री

No entry for Gautami Patil in Kolhapur


By nisha patil - 9/20/2023 7:41:02 PM
Share This News:



नर्तकी गौतमी पाटीलच्या  कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जेव्हा जेव्हा गौतमीचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. 

दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलताना गौतमीने "माझ्या कुठल्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही", असं भाष्य केलं होतं. गौतमी म्हणाली की,"माझ्या सगळ्याच कार्यक्रमात गोंधळ होत नाही. परंतु, एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला की लोक तेच धरून बसतात. बारामती तालुक्यातील झारगडवाडीकरांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे दहीहंडीचा माझा कार्यक्रम शांततेत पार पडला. काही अपवाद वगळता माझे सर्वच कार्यक्रम शांततेच पार पडतात".

दुसरीकडे, गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लावणी क्वीन'ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'घुंगरू' या सिनेमात प्रेक्षकांना राजकारणासह थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे.गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारतानाच कोल्हापूर पोलिसांनी तब्बल सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे अशा 3816 जणांना नोटीसा  बजावण्यात आल्या आहेत. 2219 जणांकडून चांगल्या वर्तणुकीच्या जामीनासह बॉन्ड घेण्यात आले आहेत. 171 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेणेत आलेले आहेत. तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सणाच्या कालावधीत हद्दीमध्ये, मंडळाजवळ अथवा मिरवणुकीमध्ये प्रवेश करणेस 641 जणांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात आली आहे.


कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एन्ट्री