बातम्या
कोणत्याही संघाच्या फुटबॉल खेळाडूवर पोलीस कारवाई नको : आमदार जयश्री जाधव
By nisha patil - 2/1/2024 4:57:25 PM
Share This News:
कोणत्याही संघाच्या फुटबॉल खेळाडूवर पोलीस कारवाई नको : आमदार जयश्री जाधव
जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित व केएसएला निवेदनाद्वारे सूचना
कोल्हापूर : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्यावेळी सामना सुरू असताना शिस्तभंग करणारे कोणत्याही संघातील खेळाडूंवर पोलिसांनी कारवाई करू नये अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदनाद्वारे केली. हुल्लडबाज प्रेक्षकांवर पोलिसांनी तर खेळाडूंच्यावर केएसएने डिसिप्लिन कमिटी नेमून कारवाई करावी अशी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली आहे.
आज आमदार जाधव यांनी पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि कोल्हापूरच्या फुटबॉल स्पर्धेविषयी चर्चा केली. काँग्रेस औद्योगिक सेलचे प्रदेश सचिव व युवा उद्योजक सत्यजित जाधव उपस्थित होते.
निवेदनातील मजकूर असा, कोल्हापूरला फुटबॉलची फार मोठी परंपरा आहे. संस्थानकाळात त्याला राजाश्रय होता. आता चांगला लोकाश्रय मिळत असल्याने फुटबॉल वाढत आहे. कोल्हापुरात फुटबॉलची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होत आहे. फुटबॉल कोल्हापूरची अस्मिता आहे.
फुटबॉल म्हणजे प्रचंड इर्षा व चुरस. फुटबॉलला मारलेली कीक ईर्षा. कोल्हापुरातला फुटबॉल या इर्षेवरच वाढला आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाचे आणि खेळाडूचे कौतुक राज्यभर होत असताना, काहीवेळा खेळाडूंचे गैरवर्तन आणि प्रेक्षकांची हुल्लडबाजीमुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट लागत आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलबाबतचे हे चित्र बदलण्यासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) व पोलीस प्रशासनाने आपल्या अधिकाराचा वापर करणे गरजेचे आहे.
यामध्ये सामन्याचे वेळी मैदानावर खेळाडूंच्यामध्ये वादावादी झाली किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची शिस्तभंग झाल्यास त्यांच्यावर केएसएने आपल्या अधिकारांमध्ये कारवाई केली पाहिजे. ही कारवाई करताना संघ कोणता याचा विचार न करता सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. सामन्यातील खेळाडूंच्यावर पोलिसांच्याकडून कारवाई झाली तर या खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते तसेच पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या भितीने फुटबॉलकडे येणारा नवीन खेळाडू थांबेल. यामुळे कोल्हापुरातील फुटबॉल कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करून केएसएने डिसिप्लिन कमिटी नेमून खेळाडूंच्यावर कारवाई करावी.
फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक संघाचे समर्थक आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणात असतात. हुल्लडबाज प्रेक्षक व समर्थकांच्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होत आहे. त्यांच्यामुळेच स्टेडियममध्ये आणि स्टेडियमच्या बाहेरचे वातावरण तणावपूर्ण राहत आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
तरी कोल्हापूरच्या फुटबॉलची बदनामी थांबवण्यासाठी आणि कोल्हापूरचा फुटबॉलला शिस्त लावण्यासाठी हुल्लडबाजी करण्याऱ्यावर पोलीस प्रशासनातर्फे तर मैदानातील खेळाडूंच्यावर केसएने कारवाई अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली आहे.
कोणत्याही संघाच्या फुटबॉल खेळाडूवर पोलीस कारवाई नको : आमदार जयश्री जाधव
|