बातम्या
मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून नोटीस
By neeta - 1/24/2024 4:44:11 PM
Share This News:
मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करताना मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. सदावर्ते यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ उपस्थित होते. सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, गरज वाटल्यास सदावर्तेंना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आली आहे.
आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्याकुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलं नसल्याचे महाधिवक्ता यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. महाधिवक्ता म्हणाले की, हजारो लोकं मुंबईच्या दिशेनं येत आहेत हे खरं आहे. राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. कायदा आणि सुव्यस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही योग्य तो सारी पावलं उचलायला तयार आहोत, पण प्रशासनावर सर्वांचे अधिकार अबाधित राखण्याची जाबबदारी आहे. आम्ही एखादं पाऊल उचलू, आणि त्याचे विपरीत परिणाम झाले? तर जबाबदारी कुणाची? हा देखील प्रश्न असल्याची भूमिका राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी मांडली.
हायकोर्टाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची काय गरज आहे? अशी विचारणा केली. यानंतर मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार असल्याचे महाधिवक्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. हजारो बैलगाड्या, ट्रैक्टर आणि लाखो लोकं शहरात आल्यास काय करायचं हे सरकारनं पाहायचं आहे, असे सांगत मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली.
मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून नोटीस
|