बातम्या

आषाढी एकादशी आणि बकरी ईदला कोल्हापूरकरांनी जपला सामाजिक सलोखा

On Ashadhi Ekadashi and Bakri Eid Kolhapurkars observed social harmony


By nisha patil - 6/29/2023 4:45:08 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : आज हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांची ईद ऊल अजहा अर्थात बकरी ईदचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय. त्यामुळे आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलाय, दरम्यान कोल्हापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज एकत्र येत आषाढी एकादशी आणि बकरीईद च्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.आषाढी एकादशी असल्याने कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नमाज पठण करत बकरी ईदच्या निमित्ताने दिली जाणारी कुर्बानी पुढे ढकलत हिंदू -मुस्लिम ऐक्याचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या शिकवणीतून प्रत्येक सणाला हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये फराळ, खीर याची देवाण-घेवाण होते. सणांमधूनच सामाजिक एकोप्याला चालला मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुस्लीम समाजाचे रियाज बागवान यांनी व्यक्त केली.

६ आणि ७ जून रोजी काही समाजकंटक तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस लावून पुरोगामी कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याला खो घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत अशा कोणत्याही प्रकाराला यापुढे थारा मिळणार नाही,  म्हणूनच हे जगावेगळे कोल्हापूर आहे अशी प्रतिक्रीया  राहुल देसाई यांनी व्यक्त केली 

यावेळी बापू ओतारी,रवी बावडेकर, अभय पळसुले रईस बागवान सुनील देसाई इर्शाद बागवान सलमान बागवान आदींसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अठरापगड जाती आणि सर्वधर्मीयांना समानता मिळाली. काही समाजकंटकांनी सोशल मीडियावरून हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले मात्र कोल्हापुरात असा प्रकार घडतोच कसा याबाबत नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. या घटनेला महिनाही उलटला नाही, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज साजरी होत असलेली ईद आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापुरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकोपा टिकावा यासाठी केलेले हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद ठरणार आहेत.


आषाढी एकादशी आणि बकरी ईदला कोल्हापूरकरांनी जपला सामाजिक सलोखा