बातम्या

खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात बी.एम.आय. तपासणी शिबीर

On the birth anniversary of Khashaba Jadhav BMI screening camp in university


By Administrator - 1/17/2024 2:07:10 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूरचे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठात नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वजन-उंची गुणोत्तर (बॉडी-मास इंडेक्सतपासणीलाही उत्तम प्रतिसाद लाभला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, विद्यापीठाचा क्रीडा अधिविभाग आणि जैव-रसायनशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजल्यापासून विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या व्यक्तींसह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक यांच्यासाठी वजन-उंची गुणोत्तर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे आणि जैव-रसायनशास्त्र विभागाचे डॉ. कैलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुचय खोपडे, किरण पाटील, सुभाष पवार, डॉ. पी.एम. गुरव, डॉ. एस. एस. काळे यांच्यासह क्रीडा विभाग आणि जैव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी या कामी परिश्रम घेतले.

आजच्या अभिवादन प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. बनसोडे, डॉ. सोनवणे, डॉ. (श्रीमती) पी.बी. दांडगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात बी.एम.आय. तपासणी शिबीर