बातम्या

ऐन दिवाळीच्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट

On the eve of Diwali, the textile industry faces a big bankruptcy


By nisha patil - 3/11/2023 1:25:18 PM
Share This News:



ऐन दिवाळीच्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट 

कापडाला अपेक्षित मागणी घटली ; व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण 

इचलकरंजी : प्रतिनिधी जागतिक बाजारपेठेत कापडाला अपेक्षित मागणी नसल्याने यंञमागावरील कापड उत्पादनात ३५ ते ४५ टक्के घट झाली आहे.परिणामी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर  वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दाटून आले आहे. एकंदरीत , मंदीच्या वातावरणामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगावर मोठा विपरीत परिणाम जाणवू लागला असून त्यामुळे वस्ञोद्योग व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

जागतिक बाजारपेठेत वस्ञोद्योगातील विविध समस्या व उत्पादित कापडाला अपेक्षित असणारी मागणी घटली आहे.याचाच परिणाम इचलकरंजी शहरासह अन्य ठिकाणी 
तयार कपडे बनवणारे गारमेंट उद्योग बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विकलेल्या कापडाचे पैसे मिळण्यास अक्षरशः चार-चार महिने प्रतिक्षा करावी लागत आहे. इचलकरंजी हे शटललेस यंञमागाचे ( साडे १५ हजार पेक्षा अधिक संख्या ) देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे केंद्र बनले आहे.  आधुनिकीकरणाचा मार्ग चोखाळलेल्या इचलकरंजीतील या वस्त्रोद्योगाला माञ आता मंदीच्या आजाराने जर्जर केले आहे. साध्या यंञमागावर सरासरी ७० ते १०० मीटर साधे भरडेकेंब्रिंग ,पाॅपलीन , मलमल  कापड विणले जात असताना एअरजेट यंञमागावर दररोज ८०० ते १ हजार मीटर गुणवत्तापूर्ण कापडाचे उत्पादन होते.

 

जागतिक बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांपासून उत्पादित कापडाला अपेक्षित मागणी नसल्याने 
सुमारे ३५ ते ४५ टक्क्यांनी कापड उत्पादनात घट झाली आहे. कापड विणून घेण्याच्या मजुरीचा दर ५२ पिकाला १६ पैशांवरून ८ ते १२ पैसे इतका घसरला आहे. साध्या यंञमागावरील कापड विणण्याचा दर १२ पैशांवरून ५ ते ६ पैशांवर घटला आहे. याशिवाय विक्री केलेल्या कापडाचे २५ दिवसांत पैसे आलेच पाहिजेत, असे ठरविण्यात आले होते. हा कालावधी वाढत जाऊन आता तो चार महिन्यांवर गेला आहे.
मजुरीचे दर १५ ते २५ टक्के कमी झाले आहेत. याशिवाय अहमदाबाद, सुरत, पाली, बालोतरा, सिल्वासा, वापी अशा परराज्यातील केंद्रात माल प्रक्रियेसाठी नेण्याची भीती दाखवून दर आणखी कमी केला जात असल्याने यंञमाग व्यावसायिकांची आर्थिक कुचंबना होत असल्याचे दिसून येत आहे.एकंदरीत ,मंदीच्या वातावरणामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगावर मोठा विपरीत परिणाम जाणवू लागला असून त्यामुळे वस्ञोद्योग व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.


ऐन दिवाळीच्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट