बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्ताने शहाजी महाविद्यालयात वर्षभर शाहू विचारांचा जागर

On the occasion of the centenary golden jubilee birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj


By nisha patil - 6/19/2024 8:37:37 PM
Share This News:



कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती दिनाचे औचित्य साधून वर्षभर विविध पंधराहून अधिक कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून शाहू विचारांचा जागर होणार असून तो अधिकाधिक विद्यार्थी,प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी दिली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे  व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे या उपक्रमास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणार आहे.
 

 26 जून रोजी शाहू जयंतीदिनी शाहू कार्यावर आधारित चित्र  रथ, सजीव देखावे,पारंपरिक वेशभूषा, शाहूंच्या जीवन कार्यावर प्राध्यापकांची, वक्त्यांची व्याख्याने, भिंती पत्रके व दुर्मिळ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, राजर्षी छत्रपती शाहू व्याख्यानमाले अंतर्गत संशोधक, अभ्यासकांची व्याख्याने, राजर्षी शाहू  यांच्या जीवन कार्यावर लोक कला, लोक संस्कृती, पोवाडे, शाहिरी, मर्दानी खेळ, लोकसंगीत,लोकनृत्य ,अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा , अंतर्विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र, राधानगरी, काळमवाडी धरण परिसरांना भेटी, विद्यार्थ्यांचा हेरिटेज वॉक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके यांना अभ्यास भेटी, राजर्षी शाहू महाराज यांनी राबवलेल्या वस्तीगृहांच्या  चळवळीवर समाजशास्त्रीय अभ्यास, संशोधन प्रकल्प, शाहूंच्या चरित्र ग्रंथांचे सामूहिक वाचन, चर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन, शाहूंच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी व छायाचित्रांचे प्रदर्शन, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, ऑनलाइन वेबिनार या सह विविध उपक्रम होणार आहेत. वर्षभर याद्वारे शाहूंच्या विचारांचा जागर होणार असून शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत अधिक अधिक पोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. 
 

 या सर्व उपक्रमांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आलेली असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील हे समन्वयक आहेत. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख , सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी यांचा या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आहे.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्ताने शहाजी महाविद्यालयात वर्षभर शाहू विचारांचा जागर