बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम सुरज पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ

Online launch of PM Suraj Portal by Prime Minister Narendra Modi


By nisha patil - 3/13/2024 8:28:39 PM
Share This News:



 पंतप्रधान भारत सरकार यांच्या वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम सुरज पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात, जिल्ह्यातील वंचित घटकातील नागरिकांनी सामाजिक न्याय विभाग व याअंतर्गत विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध विभागांच्या वंचित घटकांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभ वाटप करण्यात आला. यामध्ये नमस्ते आयुष्मान कार्ड, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना पीपीई किटचे वितरण तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना लाभाचे मंजुरी पत्र जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते  देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे समन्वय अधिकारी आशितोष कोठारी व अरुण काळेबाग, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अमर कांबळे, समाज कल्याण विभागाचे सदानंद बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभाग व या अंतर्गत विविध महा मंडळांच्या वतीने लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा व अन्य शासकीय योजनांचा लाभ चांगल्या प्रकारे मिळवून दिला जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी या विभागाचे कौतुक केले व लाभार्थ्यांना धन्यवाद दिले.

     यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. जिल्हा ग्रामीण बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी विविध बँकांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा विषयक योजनांची तर आशा रावण यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची तर स्वच्छता निरीक्षक सुनील सोळंकी यांनी नमस्ते आयुष्मान कार्ड व सफाई कामगारांसाठी पीपीटी कीट बाबतची माहिती दिली.यावेळी ओमप्रकाश कांबळे व अनिल पवार या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधल्याची माहिती मनोगतातून दिली. 

प्रास्ताविकातून सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम सुरज पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ