बातम्या

उघड्या फ्यूज पेट्या व दरवाजे याची व्हाट्सएपवर माहिती कळविण्याचे महावितरणचे आवाहन

Open fuse boxes and doors Maha distribution appeals to share information on WhatsApp


By nisha patil - 7/19/2023 6:00:36 PM
Share This News:



उघड्या फ्यूज पेट्या व दरवाजे याची  व्हाट्सएपवर माहिती कळविण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे :  उघड्या फ्यूज पेट्या, दरवाजे, तुटलेल्या तारा इत्यादींची व्हाट्सएपवर नागरिकांकडून महावितरणला माहिती मिळाल्यावर त्वरीत दुरुस्ती करून होणारे अपघात टाळता यावे यासाठी मंडळ स्तरावर व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले असून ग्राहकांनी त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. तारा तुटणे, तारांना झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी व इतर कारणांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणाला व्हाट्सएप किंवा एसएमएस द्वारे माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांना व्हाट्सएप नंबरवर फोन करून तत्काळ माहिती देता येईल.

पुणे परिमंडळ अंतर्गत रास्तापेठ मंडळ, गणेशखिंड मंडळ व पुणे ग्रामीण मंडळ यासाठी व्हाट्सएप नंबर 7875767123 असून कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर मंडळासाठी 7875769103 व सांगली मंडळ यासाठी 7875769449 तसेच बारामती परिमंडळ अंतर्गत बारामती मंडळ
यासाठी 7875768074,  सोलापूर मंडळ यासाठी 9029140455 व सातारा मंडळासाठी 9029168554 व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले आहेत.

 हे सर्व व्हाट्सएप नंबर दैनंदिन सुनियंत्रण कक्षामध्ये (डीएसएस रुम) उपलब्ध असलेल्या महावितरण कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर सुरू करण्यात आले असून यावर नागरिकांनी माहिती देऊन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ज्या नागरिकांकडे व्हाट्सएप नाहीत त्यांनी 'एसएमएस'द्वारे तक्रार केल्यास त्याचेही निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी समन्वयक म्हणून मंडळ कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) व विभागीय कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात यावे. त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना स्पष्टपणे कळविण्यात यावे. कार्यालयांकडून तक्रारीचे ताबडतोब निवारण केल्यानंतर त्याची माहिती दुरुस्त केलेल्या वीजयंत्रणेच्या छायाचित्रासह दैनंदिन सुनियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी. तसेच संबंधीत तक्रारकर्त्यांना दुरुस्तीचे काम झाल्यासंबंधी दुरुस्तीनंतरचे संबंधीत छायाचित्र व्हाट्सएपवर पाठवून अथवा मेसेज पाठवून अवगत करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.


उघड्या फ्यूज पेट्या व दरवाजे याची व्हाट्सएपवर माहिती कळविण्याचे महावितरणचे आवाहन