बातम्या

तांत्रिक प्रशिक्षणातून नोकरीबरोबरच उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Opportunity to create industrial business along with employment through technical training


By nisha patil - 7/20/2024 10:00:13 PM
Share This News:



शासनाने प्रत्येक जिल्ह्यात युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पूर्वीपासूनच सुरू केलेल्या आहेत. यातून देण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणातून प्रत्येक युवकाला नोकरी सह एक चांगला उद्योग किंवा व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, तरुण युवकांच्या हाताला काम मिळावे हा त्या संस्थेचा हेतू असून यातून बाहेर आलेली मुले नोकरी नाही मिळाली तरी एक चांगला उद्योग उभारून आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहतील. आणि व्यावसायिकतेत एवढी ताकद आहे की ते संपूर्ण जग आपल्या कवेत घेतील. यावेळी त्यांनी धीरूभाई अंबानी यांचे उदाहरण युवकांना दिले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज  यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज  येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ  यांच्या उपस्थितीत नोकरी इच्छुक  उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

     या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे २७ खासगी उद्योजकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे १४४२ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.  या पदांकरीता किमान १० वी, १२ वी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, ‍अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र होते. यावेळी एकूण २२० उमेदवारांनी सहभाग घेतला, वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ४०० मुलाखती झाल्या त्यापैकी २५१ उमेदवारांना प्राथमिक नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, सद्या चांगल्या बुद्धिमत्तेला आणि तंत्रज्ञानाला उद्योग क्षेत्रात मागणी आहे. बेकरी आणि बेरोजगारीच्या वाढत्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. यावेळी गडहिंग्लज येथील आयटीआय साठी दुरुस्ती तसेच हॉलसाठी निधी देऊ असेही आश्वासन दिले. आमदार राजेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज येथे जिल्ह्यातील पहिला मेळावा होतोय याबद्दल आयोजकांचे आभार. त्यांनी उपस्थित उद्योजकांना आवाहन केले की, ग्रामीण भागातील युवकांचा बुद्ध्यांक कुठेही कमी नाही. त्यांच्याकडे असलेली माहिती आणि नैसर्गिक कौशल्य तुमच्या उद्योगाला वरदान ठरतील. उद्घाटनाआधी पालकमंत्री मुश्रीफ यांनी आयटीआय च्या मुलांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक वाहनाची सफारी केली. 

    प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाला पालकमंत्री, आमदार राजेश पाटील यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांत मल्लिकार्जुन माने, तहसिलदार ऋषिकेश शेळके, सहायक आयुक्त संजय माळी, प्राचार्य स्वानंद देवधर, वाय डी पाटील, आयआयएमसी सदस्या कामिनी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संगीता खंदारे यांनी मानले.


तांत्रिक प्रशिक्षणातून नोकरीबरोबरच उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी - पालकमंत्री हसन मुश्रीफ