बातम्या
विरोधी पक्ष एकत्रितपणे भाजपचा पराभव करतील – राहुल गांधी
By nisha patil - 6/23/2023 4:13:22 PM
Share This News:
पाटणा – देशातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकजुटीने भाजपचा पराभव करतील असा ठाम निर्धार कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे आज पाटण्यात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे पक्ष कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्यापुढे राहुल गांधी बोलत होते.
भाजप भारतात फूट पाडण्याचे आणि द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला आणि आता आपल्याला ही विचारांची लढाई अधिक मजबूतीने करायची आहे असे आवाहन केले. एकीकडे कॉंग्रेसची ‘भारत जोडो’ विचारधारा आहे तर दुसरीकडे भाजप आणि आरएसएसची ‘भारत तोडो’ विचारधारा आहे, असे ते म्हणाले. तुम्हाला माहित आहे की द्वेषाचा द्वेषाने सामना केला जाऊ शकत नाही. केवळ प्रेमानेच त्याचा पराभव केला जाऊ शकतो.
कॉंग्रेस देशाला एकत्र आणण्यासाठी आणि प्रेम पसरवण्यासाठी काम करत आहे,असे ते म्हणाले. कॉंग्रेसचा डीएनए बिहारमध्ये असल्यामुळेच आम्ही बिहारमध्ये आलो आहोत, असे गांधी म्हणाले. देशातील सर्वच विरोधी पक्ष येथे आले आहेत आणि आम्ही एकत्रितपणे भाजपचा पराभव करणार आहोत, असे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजपच्या नेत्यांनी जोरात भाषणे दिली आणि ते तेथे सर्वत्र फिरले, परंतु तेथे त्यांचा काय निकाल लागला हे तुम्ही पाहिले आहे असे ते म्हणाले. कॉंग्रेस एकजूट होताच कर्नाटकात भाजप गायब झाला. तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप कुठेही नसेल आणि तेथे कॉंग्रेस जिंकेल,असे मी आज निर्धाराने सांगू शकतो असे त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्ष एकत्रितपणे भाजपचा पराभव करतील – राहुल गांधी
|