बातम्या
कोल्हापूरअंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास विरोध! महाद्वार व्यापारी असोसिएशन चा निर्णय
By nisha patil - 12/3/2024 11:34:36 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर प्रतिनिधी: अनेक वेळा जिल्हाधिकारी यांना भेटून सोपा व कमी खर्चाचा पर्याय देवूनही जर प्रशासन प्रस्तावित अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याने बाधित होणाऱ्या व्यापारी आणि रहिवाशांना त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या मागणीचा विचारही करत नसेल तर या आराखड्यास विरोधच करू, असा इशारा महाद्वार व्यापारी असोसिएशनने पत्रकाद्वारे दिला आहे. आमचे अस्तित्व संपविणे आणि कोल्हापूरची मूळ बाजारपेठ उध्वस्त करणारा आराखडा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.या पत्रकात म्हटले आहे, गेले वर्षभर मंदिर परिसरातील सुमारे 3 एकर क्षेत्रफळांमधील सर्व रहिवासी व व्यापारी इमारती ताब्यात घेऊन व पूर्णपणे पाडून हा परिसर मोकळा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत व्यापारी व रहिवाशांनी अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. मंदिर परिसराचा विकास करताना सर्व इमारती पाडल्यानंतर कोल्हापूर शहराची मूळ बाजारपेठ उध्वस्त होऊ शकते. तसे झाल्यास कोल्हापूरच्या एकूण अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होईल हेही अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. हे टाळण्यासाठी सर्व व्यापारी व्यवसायिक यांचे पुनर्वसन याच परिसरात आणि महानगरपालिकेचे कपिलतीर्थ मार्केट तसेच जवळपासच्या काही मोठ्या खासगी मिळकती अधिगृहीत करून त्या ठिकाणी सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्याना वारंवार कल्पना दिली आहे. परंतु यापूर्वीच्या व सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या न्याय्य, व्यवहार्य आणि कमी खर्चाच्या आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नसून केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणा कारणीभूत आहे.जिल्हा समितीने सोमवारी सुमारे 1442 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. परंतु दुर्दैवाने त्यातही परिसरातीलांच्या पुनर्वसनाबाबत काहीही अंतर्भूत केलेले नाही.
तर टोकाचा संघर्ष करू
बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसराचा विकास करताना जर मंदिरावर व्यवसाय अवलंबून असलेले व्यावसायिक आणि पिढ्यानपिढ्या मंदिराशी ऋणानुबंध असलेले रहिवाशांचे येथील अस्तित्व संपून त्यांचे भवितव्य भकास होणार असेल तर अशा विकासास महाद्वार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध राहील आणि त्याकरिता रस्त्यावर तसेच न्यायालयात टोकाचा संघर्ष करावयास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, जयंत गोयाणी, मनोज बहिरशेठ, विक्रम जरग यांनी दिला आहे.
कोल्हापूरअंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास विरोध! महाद्वार व्यापारी असोसिएशन चा निर्णय
|