बातम्या
इचलकरंजीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
By Administrator - 11/21/2023 1:07:45 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दगडूलाल मर्दा स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदरची स्पर्धा येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र येथे रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सदरच्या वक्तृत्व स्पर्धेकरिता ना. धों महानोर - प्रतिभासंपन्न साहित्यिक, पर्यावरण रक्षण आपली जबाबदारी, आरक्षण एक यक्षप्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्ता एक आव्हान, नाती हरवत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय आर्थिक विकासाचे वास्तव हे विषय आहेत. सदरची स्पर्धा ज्युनिअर व सीनियर कॉलेज आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खुली राहील.स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक ५००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ३००० रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक २००० रुपये व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ १००० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील. नाव नोंदणीसाठी दिनांक १४ डिसेंबर ही अंतिम मुदत असून स्पर्धेसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी आहे. इच्छुक स्पर्धकांनी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा सुंदर बागेजवळ, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर (दूरध्वनी ८२३७५२२५२२, ९९६०००१२०७ किंवा ९८५०५८८८२५) येथे संपर्क साधावा असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे
इचलकरंजीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
|