बातम्या
शिवाजी विद्यापीठात फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचे आयोजन
By nisha patil - 8/4/2024 8:00:15 PM
Share This News:
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ या दरम्यान फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहामध्ये या सप्ताहाचे उदघाटन होणार आहे. या समारंभासाठी प्रसिद्ध विचारवंत सुधाकर गायकवाड हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे असतील. तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचवेळी श्री. सुधाकर गायकवाड लिखित "दलित सौन्दर्यशास्त्र" या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते होणार असून या ग्रंथावर डॉ. देवानंद सोनटक्के व डॉ. सचिन गरुड हे भाष्य करणार आहेत.
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी डॉ. रवींद्र ठाकूर यांचे "महात्मा जोतीराव फुले: व्यक्ती व वाङमय" या विषयावर व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या "शिववार्ता" या युट्यूब चॅनेलवरून सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन प्रसारित होईल.
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असून सदर स्पर्धा दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी १) फुले-शाहू-आंबेडकर विचार त्रिसूत्री, २) अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३) फुले-शाहू-आंबेडकर: आजची गरज, ४) प्रॉब्लेम ऑफ रुपी नंतरची शंभर वर्षे आणि ५) फुले-शाहू-आंबेडकर आणि स्त्री-पुरुष समानता हे विषय असणार आहेत. सदर स्पर्धा पदवी व पदव्युत्तर अशा दोन गटात होणार असून स्पर्धेसाठी दोन्ही प्रत्येकी गटात प्रथम पारितोषिक रु.१,००० मानचिन्ह व प्रमाणपत्र; द्वितीय पारितोषिक रु.७५० मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक रु.५०० मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तीन उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीमती सीमाताई कांबळे यांचे "वारसा बाबासाहेबांचा" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या होणाऱ्या जयंतीनिमित्त "अनंत पैलूचा सामाजिक योद्धा: दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान राजर्षी शाहू सिनेट सभागृहात शनिवारी दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे असतील. तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सप्ताहाच्या चौथ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येईल.
सर्वांनी या विविध उपक्रमास उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठात फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचे आयोजन
|