इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सवाचे आयोजन

Organized by Ichalkaranjit Vasant Varsha Music Festival


By nisha patil - 5/25/2023 6:14:25 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ व इचलकरंजी महापालिकेच्यावतीने शुक्रवार २ व शनिवार ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे वसंत वर्षा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रख्यात गायक व संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांची मेजवानी चाखायला मिळणार आहे, अशी माहिती उमेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    ते म्हणाले, इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत घोरपडे सरकार हे कलाप्रेमी व संगीतप्रेमी होते. यामुळे शहर व परिसरातील अनेक संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार नावारूपास आले. संगीताची गौरवशाली परंपरा असलेल्या इचलकरंजी व परिसरातील संगीतप्रेमींना दीर्घ कालावधीनंतर संगीत व वादन कलेची अपूर्व अशी मेजवानी मिळणार आहे. शास्त्रीय संगीताचा संपूर्ण भारतभर प्रसार करणाऱ्या इचलकरंजीच्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी मंडळामार्फत आयोजित संगीत महोत्सवात आजवर भारतातील बहुतांशी सर्वच नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदाही महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतीक कार्य विभाग हे या वसंत वर्षा संगीत महोत्वाचे मुख्य आयोजक असून, पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ मुख्य समन्वयक आहेत. तर इचलकरंजी महानगरपालिकेचेही सहकार्य या आयोजनास मिळाले आहे. तसेच शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभिषण चवरे यांचे या आयोजनात मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचेही या आयोजनास विशेष सहकार्य लाभले आहे.
   या महोत्सवात पंडित राहुल देशपांडे, विदुषी इंद्राणी मुखर्जी, विदुषी सानिया पाटणकर हे कलाकार (गायन) तर पंडित राकेश चौरसिया (बासरी), पंडित पुष्पराज कोष्टी सूरबहार) तर पंडित सुधांशु कुलकर्णी व सारंग कुलकर्णी (हार्मोनियम जुगलबंदी) अशा संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांकडून आपली कला सादर केली जाणार आहे. यापैकी सुरबहार हे वाद्य इचलकरंजी व परिसरात पहिल्यांदाच ऐकावयास मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
    प्रदीर्घ कालावधीने इचलकरंजीत आयोजित होत असलेल्या या भव्य संगीत महोत्सवाचा रसिकांनी सहपरिवार उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी संतोष साधले, अनिल भिडे, बापू तारदाळकर, गिरीश कुलकर्णी, गौरी पाटील, चित्कला कुलकर्णी आदी उपस्थित होते.


इचलकरंजीत वसंत वर्षा संगीत महोत्सवाचे आयोजनspeednewslive24#