बातम्या

अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Organized free community weddings through Arun Dongle Charitable Trust


By nisha patil - 4/20/2024 1:18:00 PM
Share This News:



कोल्हापूर ता.२०: अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे आणि श्री.संत बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे चेअरमन  अरुण गणपतराव डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोफत शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याहि वर्षी  श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे शुक्रवार दिनांक १० मे २०२४ इ.रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व विवाह इच्छूक तरुण-तरुणी किंवा त्यांच्या पालकांनी लग्नाची नोंदणी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावी असे आवाहन अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी केले. गेली १३ वर्षे सलग या सामाजिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट, घोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करणाऱ्या दांपत्याला  अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट कडून वधू-वरासाठी मनी मंगळसूत्र, लग्नाचा पेहरावा, संसार उपयोगी भांड्यांचा सेट, विनामूल्य विवाह मंडप, हारतुरे, भटजी, अक्षता, वऱ्हाडी मंडळीसाठी मोफत भोजन व्यवस्था याच बरोबर वधूपित्यास  शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.                    

या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून विवाह झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून वधुपित्यास रुपये २५,००० इतके अनुदान दिले जाते तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाकडून मागासवर्गीय वधूपित्यास रु.२०,००० इतके अनुदान दिले जाते.

सन २०१० पासून अरुण डोंगळे ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळा या उपक्रमाद्वारे ७०० हून अधिक जोडप्यांना विवाह बंधनात बाधण्यात मदत केली आहे. अशा अनेक कुटुंबाना आणि भावी नव वधूवरांना प्रतिष्ठेचे लग्न करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ट्रस्टच्या वतीने  प्रयत्न असतो. तरी जास्तीत जास्त वधू-वरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. विवाहासाठी नाव नोंदणी दि.५ मे २०२४ पर्यंत करणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीसाठी पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सुहास डोंगळे- ९८२२९७६६६६, धनाजी पाटील -९४२३२८०१७१, पवन गुरव – ९६९९७०१०४०, उत्तम पाटील – ९६६५८९६६६६, देवबा पाटील – ७७९८८६३३३२.


अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन