शैक्षणिक
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन
By nisha patil - 3/3/2025 2:31:26 PM
Share This News:
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि सृजनशीलतेला चालना देणाऱ्या श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष आकर्षण ठरलेल्या AI Robot च्या अभिनव सादरीकरणाने झाली. श्रेयस चोरगे, जय माने आणि अथर्व तोरस्कर या आठवी अ वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "Human Following AI Robot" ने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या रोबोटने पाहुण्यांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली, ज्यामुळे उपस्थित सर्वांना या प्रयोगाचे कौतुक वाटले. हा AI रोबोट माणसाच्या हालचालींना अनुसरून त्याला फॉलो करतो आणि विचारलेल्या प्रश्नांना अचूक तांत्रिक उत्तरे देतो. उपस्थित पालक आणि मान्यवरांनी या नवकल्पनेची प्रशंसा केली.
या विज्ञान प्रदर्शनात एकूण १६५ प्रयोग सादर करण्यात आले. यामध्ये रोबोटिक्स, हायड्रोजनिक फार्मिंग, वेंडिंग मशीन, सेन्सर गॉगल्स, वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी यांसारखे नाविन्यपूर्ण प्रयोग होते. तसेच, काही विद्यार्थ्यांनी हवामान बदल, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा स्रोत यांसारख्या विषयांवर सादरीकरण केले.
याशिवाय कला विभागात विद्यार्थ्यांनी हस्तकला, चित्रकला आणि शिल्पकलेचे अप्रतिम नमुने सादर केले होते. प्रदर्शनाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष अनिल पाटील, मुख्याधिपिका वॉयलेट बारदेस्कर आणि संस्थापक सुभाष चौगुले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे आणि कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो आणि भविष्यासाठी त्यांची उत्तम तयारी होते, असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांनी पालक भारावून गेले. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबद्दल आभार मानले. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांचा नव्या तंत्रज्ञानाशी आणि संशोधनाशी अधिक जवळून परिचय होतो, असेही पालकांनी सांगितले.
या विज्ञान व कला प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून, भविष्यात ते विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात नवी उंची गाठतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन
|