बातम्या

युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने "राजेश युथ फेस्टीव्हल" चे आयोजन : युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांची माहिती

Organizing Rajesh Youth Festival on behalf of Yuva Sena and No Mercy GroupInformation of Youth Leader Pushkaraj Kshirsagar


By nisha patil - 7/31/2023 7:42:50 PM
Share This News:



कोल्हापूर दि.३१  ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “राजेश युथ फेस्टिव्हल” चे येत्या रविवार दि. ०६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत “मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर” येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फुटबॉल स्पर्धा, कलाकृती स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धांसह डीजे पार्टी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विशेषतः उपस्थित युवा वर्गास निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

              याबाबत अधिक माहिती देताना पुष्कराज क्षीरसागर म्हणाले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाची भव्यता वाढविण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी राजेश युथ फेस्टीव्हलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या फेस्टिव्हलचा प्रारंभ दि.३ ऑगस्ट २०२३ रोजी टर्फ फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. दि.६ ऑगस्ट या मैत्री दिनी मेरी वेदर ग्राउंड येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ दि.६ रोजी मेरी वेदर मैदान येथे सायंकाळी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता रॉक बँण्डने फेस्टीव्हलची सुरवात होणार आहे. यावेळी युवा वर्गा साठी डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता मेरी वेदर मैदान येथे भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार आहे.

 राजेश युथ फेस्टिव्हल अंतर्गत होणारे कार्यक्रम

            या फेस्टीव्हल अंतर्गत टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३ ते ५ ऑगस्ट दरम्यान टिकी- टाका टर्फ ग्राउंड, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील ६४ फुटबॉल संघांनी सहभाग नोंदविला असून, सदर स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रु.२५ हजार व राजेश युथ चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघास रोख रु.१५ हजार व उपविजेता चषक, तृतीय संघास रोख रु.५ हजार व चषक यासह प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि टॉप स्कोरर ऑफ द टूर्नामेंट अशी प्रत्येकी रु.२५०० इतके वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे.

            या फेस्टीव्हल अंतर्गत दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आर्ट (कलाकृती) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या स्पर्धकास रोख रु.१० हजार व ट्रॉफी, उपविजेत्या स्पर्धकास रोख रु.७ हजार ५००, तृतीय क्रमांकास रु.५ हजार व उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी रु.२५०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            यानंतर या फेस्टीव्हल अंतर्गत दि.६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आंतर महाविद्यालयीन टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेचे आयोजन करणात आले असून, यात शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, कॉमर्स कॉलेज, गोपालकृष्ण गोखले कॉलेज, महावीर कॉलेज, छत्रपती शहाजी महाविद्यालय आणि के.एम.सी. कॉलेज या संघांनी सहभाग नोंदविला आहे.

दि.६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सौंदर्य स्पर्धा (फॅशन शो) चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयीन युवती सहभागी होणार आहेत. यामधील विजेत्या स्पर्धकास रोख रु.१५ हजार, विजेता मुकुट आणि शॅस, उपविजेत्या स्पर्धकास रोख रु.१० हजार आणि शॅस, तृतीय स्पर्धकास रोख रु.५ हजार यासह बेस्ट वॉक, बेस्ट स्माईल, बेस्ट पर्सनॅलिटी, ओव्हर ऑल कोन्फिडन्स अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सांघिक नृत्य स्पर्धेचे (ग्रुप डान्स) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये . या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रु.१५ हजार व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघास रोख रु.१० हजार व उपविजेता चषक, तृतीय संघास रोख रु.५ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहे.

            राजेश युथ फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवा वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी केले आहे. या महोत्सवाकरिता मोफत प्रवेश असून, आवश्यक प्रवेशिका शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ, राजमंदिर आईसक्रिम नागाळा पार्क, संजय फरसाण स्वीट्स जुना बुधवार पेठ, स्वामी समर्थ फोटो स्टुडीओ निवृत्ती चौक, कुणाल मोबाईल मिरजकर तिकटी, शुभम सलून उत्तरेश्वर पेठ याठिकाणी उपलब्ध आहेत.   


युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने "राजेश युथ फेस्टीव्हल" चे आयोजन : युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांची माहिती