बातम्या

कोल्हापूर परिमंडलात ७२ कोटींच्या वीजबिलांची थकबाकी

Outstanding electricity bills of 72 crores in Kolhapur circle


By nisha patil - 11/26/2024 10:56:24 PM
Share This News:



कोल्हापूर परिमंडलात ७२ कोटींच्या वीजबिलांची थकबाकी

वीजबिल भरा सहकार्य करा- महावितरण

कोल्हापूर / सांगली, दि. २६ नोव्हेंबर २०२४: विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडलामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ०४ लाख ९३ हजार ४१९ ग्राहकांकडे ७२ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे थकबाकी वसुलीच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल न भरणाऱ्या २३४२ वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. 

कोल्हापूर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यात २ लाख ४३ हजार १२९ ग्राहकांकडे ३६ कोटी ७४ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार २९० ग्राहकांकडे ३५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.  

वीज बिल थकवणाऱ्या २३४२ ग्राहकांची वीज जोडणी तोडली

कोल्हापूर परिमंडलात अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकवणाऱ्या २३४२ ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आली आहे. यामध्ये सांगली जिल्यातील १२३१ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ६९ लाखांची थकबाकी होती तर कोल्हापूर जिल्ह्यातील ११११ ग्राहकांचा समावेश असून यांच्याकडे ४२ लाखांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.   

ऑनलाईन वीज बिल भरणा करा केव्हाही व कुठूनही

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.


कोल्हापूर परिमंडलात ७२ कोटींच्या वीजबिलांची थकबाकी