बातम्या

पोटाच्या अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे ‘ओवा’

Ova is a panacea for many stomach ailments


By nisha patil - 9/3/2024 7:24:22 AM
Share This News:



शेकडो वर्षांपासून ओव्याचा उपयोग विविध आजारात केला जात आहे. आयुर्वेदात ओव्याला खूपच महत्व आहे. आजही अनेक घरात ओवा आवर्जून ठेवला जातो. लहान मुलांसाठी तर ओवा खुपच गुणकारी ठरतो. ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. ओवा कफ, पोट, छातीचे दुखणे, उचकी आणि ढेकर या आजारांसाठी लाभदायक आहे. तसेच ओव्याचे अनेक घरगुती उपाय असून त्याची माहिती घेऊयात.

डोकेदुखी असल्यास, मायग्रेनचा झटका आल्यास ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. आर्थरायटिसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात वेदना होत असल्यास ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो. ज्यांना नेहमीच कफ होतो त्यांनी १०० मि.लि. पाण्यात थोडा ओवा टाकून काही मिनिटे धिम्या आचेवर उकळून घ्यावा. थंड झाल्यावर या मिश्रणाचे सेवन करावे. यामध्ये साखरही टाकल्यास हरकत नाही. पोटात दुखत असल्यास तेलात ओव्याचे थोडेसे दाणे टाकून गरम करावेत. कोमट झाल्यावर या तेलाने पोटाचा हलका मसाज करावा. यामुळे वेदना कमी होतात. मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनेपासूनही ओव्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. ओव्याचे चार-पाच दाणे चावून खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.

ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. पोटाशी संबंधित समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका होते. छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. दातदुखीमध्येही ओवा गुणकारी आहे. दात दुखत असल्यास लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकल्यास आराम मिळतो.


पोटाच्या अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे ‘ओवा’