बातम्या

अवयव प्रत्यारोपण सेवेद्वारे रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य - आमदार सतेज पाटील

Patient through organ transplant service MLA Satej Patil can be reborn


By neeta - 2/3/2024 5:23:05 PM
Share This News:



कोल्हापूर :  अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेले रुग्ण आणि अवयव दाते यांच्या संख्येत अतिशय तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी जनजागृती त्याचबरोबर सर्व रुग्णालयामध्ये अवयवदानाबाबत इकोसिस्टीम तयार होणे गरजेचे आहे. डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे सुरु केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन डी वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील यांनी केले.

डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी डीपीयू सुपर सपेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर ऑपरेशन्स डॉ संजय पठारे, हृद्य प्रत्यारोपण तज्ञ व हृद्यरोग विभाग प्रमुख डॉ. अनुराग गर्ग, आंतरराष्ट्रीय कर्डीओलोजीस्ट डॉ. विवेक मनाडे, फुफ्फुस रोपण तज्ञ डॉ. राहुल केंद्रे, डी वय पाटील एज्युकेशन सोसायटी सचिव श्रीपाद धरणगुत्ती, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ, राकेश कुमार मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ के प्रथपन, कार्यकारी संचालक डॉ ए . के. गुप्ता, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, कुलसचिव व्ही. व्ही भोसले, डॉ. शिंपा शर्मा, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा, उपकुलसचिव संजय जाधव, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. अजित पाटील, प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे, प्राचार्य डॉ उमाराणी जे., प्राचार्य रुधिर बारदेसकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील म्हणाले, आजच्या धावपळीच्या युगात विविध कारणामुळे अवयव निकामी होण्याचे व त्यामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण वाढत आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट असताना त्यावेळी होणारी पळापळ मी जवळून अनुभवली आहे. अवयव मिळत नसल्याने दररोज 20 लोकांचा मृत्यू होतो. यातूनच आपल्या जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरु करण्याबाबत विचार सुरु झाला आणि डॉ. भाग्यश्रीताई पाटील आणि डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही ओपीडी आज सुरू करता आली याचा आनंद होत आहे. 

 काही वर्षांपूर्वी हृदय रोग आणि त्यानंतर कॅन्सरसाठी मदतीची मागणी होत होती. आता ही जागा अवयव प्रत्यारोपणाने घेतली आहे. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून या माध्यमातून अवयव निकामी झालेल्या रुग्णाचा पुनर्जन्म घडवणे शक्य आहे. कोरोनानंतरच्या काळात कोल्हापूर हे वैद्यकीय हब बनले असून या ठिकाणी अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. या माध्यमातून अनेक गरजवंताना उत्तम सेवा करण्याची संधी डी. वाय. पाटील ग्रुपला मिळणार आहे.

    डीपीयू हॉस्पिटलचे ऑपरेशन्स अँड बिझनेस डायरेक्टर डॉ. संजय पाठारे म्हणाले, या ओपीडीच्या माध्यमातून जीवन जगण्याची दुसरी संधी रुग्णांना प्राप्त होणार आहे. डीपीयूच्या माध्यमातून सध्या किडनी, लिव्हर, कॉर्निया, हार्ट व लंग ट्रान्सप्लांट सुविधा उपलब्ध आहेत. या उपचारांसाठी कोल्हापुरातील रुग्णांना आता पुण्यात येण्याची गरज नाही. सर्व प्राथमिक तपासण्या येथेचे करणे शक्य होणार आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट संपूर्णपणे रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे  डीपीयू हे पहिलेच हॉस्पिटल आहे. आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेल्या व्हिजन आणि डॉ. भाग्यश्रीताई पाटील आणि डॉ. संजय डी. पाटील यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या ओपीडीमुळे अनेक गरजवंतांना लाभ मिळेल.

हृद्य प्रत्यारोपण तज्ञ डॉ. अनुराग गर्ग यांनी अवयदानाची प्रक्रिया व अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. अवयव दाता मिळवणे आणि अवयव मॅच करणे आणि त्यासाठीचा निधी उभारणे या प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. राहुल केंद्रे यांनी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बद्दलची माहिती दिली. फुफ्फुस आणि हृदय यांची एकत्रित पत्यारोपण करणारे डीपी हॉस्पिटल हे पहिल्या हॉस्पिटल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विवेक मनाडे यांनी हृदय दान, प्रत्यारोपण व संबंधित प्रक्रियेची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविक केले तर आभार डॉ. डॉ.कुणाल ताशीलदार यांनी मानले.    


शेवटच्या सोमवारी ओपीडी

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही ओपीडी सुरू राहणार आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणा संबंधित तपासण्या होणार असून आवश्यकता भासल्यास पुणे येथील डीपीयु हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

कदमवाडी: अवयव प्रत्यारोपण ओपीडीचा शुभारंभ करताना आमदार सतेज पाटील. समवेत डॉ संजय पठारे, डॉ. अनुराग गर्ग, डॉ. विवेक मनाडे, डॉ. राहुल केंद्रे, डॉ के प्रथापन, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ.वैशाली गायकवाड.      
 


अवयव प्रत्यारोपण सेवेद्वारे रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य- आमदार सतेज पाटील