राजकीय
लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरलयं – दौलत देसाई
By nisha patil - 11/18/2024 11:09:41 AM
Share This News:
लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरलयं – दौलत देसाई
न्यू शाहूपुरीत महाविकस आघाडीची कोपरा सभा
कोल्हापूर, – माझ्यासह कित्येक दिग्गज आमदारकीचे तिकीट मागत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. मात्र सतेज पाटील यांनी एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन इतिहास घडवला आहे. लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरवले असून लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे असे दौलत देसाई म्हणाले. न्यू शाहूपुरी येथे लाटकर यांच्यासाठी महाविकास आघाडीची कोपरा सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, मंजित माने, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, हर्षल सुर्वे हे प्रमुख उपस्थित होते. माजी आमदार स्व. दिलीप देसाई यांच्यानंतर पुन्हा एकदा ई वॉर्डाचा आमदार होत आहे. यासाठी माझ्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. राजेश लाटकर यांच्या विजयासाठी परिसरातील नऊ मंडळे एकत्र आली आहेत. ह्या सर्वांची ताकद व सर्वसामान्य जनतेला आपला हक्काचा आपल्यातीलच व्यक्ती आमदार व्हावा असे वाटत असल्यामुळे लाटकर यांचा विजय निश्चित आहे असे दौलत देसाई यांनी सांगितले. संजय पवार म्हणाले, तुमची कामे करणारा, तुमचे अश्रू पुसणारा, तुमच्या समस्या सोडवणारा सुशिक्षित उमेदवार महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे. इथली माती वेगळी आहे. इथली जनता पैशाला भुलणार नाही. राजेश लाटकर यांना निवडून देऊन कोल्हापूरकरांनी इतिहास घडवावा. येत्या २० तारखेला गद्दाराला गाडायचे आणि तुमच्या परिसरातील एका प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करायचे तुमचे स्वप्न साकार होणार आहे.
यासाठी सर्वांनी आपली मतदानाची ताकद एकजुटीने लाटकर यांच्या मागे लावा आणि प्रभागातील समस्यांचा निपटारा करा. संदीप देसाई म्हणाले, उत्तरचे उत्तर प्रेशर कुकर हे मतदारांनीच ठरवले आहे. त्यामुळे तुमच्या-माझ्या मनातील, टक्केवारी न मागणारा, राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत काम केलेल्या राजेश लाटकर याना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. कोणत्या योजनेसाठी कोणत्या योजनेतून निधी आणता येतो, याची जाण असणाऱ्या राजू लाटकर यांची लाट येत्या वीस तारखेला येऊ दे आणि तेवीस तारखेला विरोधक वाहून गेले पाहिजेत अशी ताकद त्यांच्या मागे लावूया असे देसाई म्हणाले.
यावेळी उपस्थितांना साम्भोडीत करताना राजेश लाटकर म्हणाले, खर्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यातच यांची १५ वर्षे गेली. त्यातच गेल्या चार वर्षांपासून राज्यभर महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे प्रशासकाच्या नावाखाली यांनी राज्याच्या तिजोरीची लुटच लुट केली. या लुटीचा एक हिस्सा घेतलेले विरोधी उमेदवाराची भूक कधी भागतच नाही. त्यासाठी डॉक्टर, अधिकाऱी, कॉन्ट्रॅकटरना धमकी देणे, शेजारी, बिल्डरला मारहाण करण्यात यांनी धन्यता मानली. कोणी किती काम केले, याचा लेखाजोखा मांडायचा असेल तर त्यांना माझे तुमच्यासमोर आव्हान आहे. त्यांनी कधीही, कुठेही व्यासपीठावर चर्चेसाठी बोलवावे. जनताच ठरवू दे खरे काय आणि खोटे काय. हिंदुत्वच्या नावाखाली खोटा प्रचार करणाऱ्या विरोधी उमेदवाराने भगव्याचा अपमान केला व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. ही गद्दार प्रवृत्ती गाडण्यासाठी जनतेने मला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रेशर कुकर आता घराघरात पोहोचले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी करून कोल्हापूरकर इतिहास घडवतील असा विश्वास आहे असे लाटकर पुढे म्हणाले. यावेळी उत्तम पाटील, भय्या शेटके, वासीम जमादार, यासीम जमादार, प्रमोद अतिग्रे, दिलीप शिर्के, संजय घाडगे, मीरासाहेब जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते
लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरलयं – दौलत देसाई
|