बातम्या
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड
By nisha patil - 2/28/2024 9:14:07 PM
Share This News:
पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. प्रिंटिंग मशीन, पंचवीस लाखांच्या बनावट नोटा, करन्सी पेपर हे सगळं छाप्यात हाती लागलंय. एबीपी माझाने या बनावट नोटा बाजारात असल्याचा पुरावा ही दिला आहे. खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाने गृह विभागाची झोप उडाली आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सध्या पुण्याच्या बाजारात दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या काळाबाजाराचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे या नोटांची छपाई सुरु असतानाच पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चलनातील नोटांमध्ये चमकणारी एक तार असली की ती नोट खरी मानली जाते. अगदी तशीच तार या बनावट नोटांमध्ये ही आहे. त्यासाठी लागणारा करन्सी पेपर या टोळीने थेट चीनवरून मागवला. अलीबाबा वेबसाईटवरून ही खरेदी करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पंचवीस लाखांच्या बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी तयार होत्या. चाळीस हजार दिले की एक लाखांच्या बनावट हे देऊ करायचे. इतक्या खुलेपणाने हा काळाबाजार सुरु होता. त्यामुळं हुबेहूब दिसणारी पाचशे रुपयांची ही नोट बनावट आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्याचा पुरावा एबीपी माझाने दिला आहे. पण सध्या बाजारात हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा आहेत तरी किती? याचाच छडा लावण्याचं आणि या टोळीच्या मुळाशी जाण्याचं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे.
पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली. एक लाखाच्या बदल्यात तीन लाख रुपये देतो, असं आमिष दाखवणाऱ्याने त्यास सील पॅक बॉक्स दिला. वरती फक्त पाचशेच्या दोन नोटा होत्या. प्रत्यक्षात बॉक्स खोलला असता, आत वह्या निघाल्या अन पाचशेच्या दोन्ही नोटा ही बनावट असल्याचं लक्षात आलं.
देहू रोड पोलिसांना बनावट नोटा विक्री कऱण्यासाठी एक व्यक्ती मुकाई चौकात येत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचना आणि थेट त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तपास केला असता दिघी परिसरात या बनावट नोटांची छपाई सुरु असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी दिघी परिसरात छापा टाकला आणि रंगेहात सहा जणांना पकडलं आणि त्यांना अटक केली. त्यावेळी 440 हूबेहूब 500 च्या नोटा सापडल्या. त्यासोबतच 4484 कटिंग करण्यासाठी तयार असलेल्या नोटा त्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड
|