बातम्या

पोलीस महिला कर्मचारी एकटी लढत होती मात्र बाकी सगळे बघायची भूमिका करत होते...

Policewomen were fighting alone but everyone else was watching


By neeta - 12/29/2023 12:21:05 PM
Share This News:



पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगार भर रस्त्यात कोयता काढून दहशत निर्माण करतात. त्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पुणे शहरात मोकळेपणाने फिरणे ही सोयीचे नाही का असा प्रश्नचिन्ह आता तेथील नागरिकांना उपस्थित होत् चाललाय. काही ना काही गुन्हेगाराच्या बातम्या पुणे शहरातून समोर येत असतात. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे
    पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई केली जात असल्यानंतर कोयता गँगचा धुडघूस सुरुच असतो. पुणे वडगाव शेरी परिसरात गुन्हेगारीची मोठी घटना घडली. या ठिकाणी टोळक्याने कोयता, दगड आणि विटांनी हल्ला सुरु केला होता. रात्री अकरा वाजता भर रस्त्यात होत असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. परंतु गर्दीतील कोणीही मध्ये पडायला तयार झाले नाही. त्याचवेळी पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलिस हवालदार सीमा वळवी घरी जात होती. पण त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरु केले. पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले.

काय झाला प्रकार

वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता वाद सुरु होता. काही जण एकमेकांना मारहाण करत होते. दगड, विटांचा मारा होत होतो. त्याचवेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी ड्यूटी संपवून घरी जात होत्या. गर्दी पाहून त्या थांबल्या. आपल्या कराऱ्या आवाजात मारहाण करणार्‍यांना दरडावले. त्या वेळी काही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु एका आरोपीने कोयता काढला. त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले. एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या. या वेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणी आले नाही.

दोन तरुण जखमी

एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे दोन जण जखमी झाले. वळवी यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडले. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला. चंदननगर पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. अवघ्या 20 मिनिटांत पोलिसांनी मारहाण करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकल्या. भर रस्त्यावर धुडघूस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले. यामुळे या कारवाईचे कौतुक होते आहे. सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या.


पोलीस महिला कर्मचारी एकटी लढत होती मात्र बाकी सगळे बघायची भूमिका करत होते...