बातम्या

संवेदशील क्षेत्रांकडे मतदान पथके रवाना

Polling teams dispatched to sensitive areas


By nisha patil - 4/16/2024 4:47:14 PM
Share This News:



येत्या 19 एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. हा मतदारसंघ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील कक्षेत येत असल्याने त्याठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य नेण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
दरम्यान, यंदा पहिल्यांदा या निवडणुकीसाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आलीय. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आजपासून पथके रवाना करण्यात आली आहेत. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागातील 68 मतदान केंद्रांवर निवडणुकीचे काम करण्यासाठी कर्मचारी रवाना झालेत.

 

या मतदान केंद्रासाठी 72 निवडणूक संघातील 295 मतदान अधिकारी आणि कर्मचारी ईव्हीएम आणि इतर युनिट्ससह भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने आज सकाळी सुरक्षितपणे बेस कॅम्पवर आणण्यात आले.
 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून अहेरी विधानसभा मतदारसंघ हा अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त समजला जातो. या भागात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांची सुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जवानांसाठी पहिल्यांदाच विशेष सोय करण्यात आली आहे.
 

कुठलाही पोलीस जवान मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने यंदा जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिसांसाठी टपाली मतदान सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या उपक्रमामुळे सुमारे 600 जवानांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे.


संवेदशील क्षेत्रांकडे मतदान पथके रवाना