बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकांना जलद सेवा द्यावी

Pradhan Mantri Suryaghar free electricity scheme should provide fast service to customers


By nisha patil - 9/27/2024 11:09:23 PM
Share This News:



कोल्हापूर, दि.२७ सप्टेंबर २०२४ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार २२६ वीज ग्राहकांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. जिल्ह्यात या योजने अंतर्गत एक लाख ७२ हजार वीज ग्राहकांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या वीज ग्राहकांना जलद सेवा द्यावी, असे निर्देश महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजने अंतर्गत जिल्ह्यातील अधिकृत नोंद असलेल्या सोलर एजन्सींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना काटकर म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजने अंतर्गत लाभ घेतेलेल्या ग्राहकांची एकत्रित स्थापित क्षमता ७९६८ किलोवँट आहे. जिल्ह्यातील लाभार्थी संस्था व सौर ऊर्जेची स्थापित क्षमता वाढवण्याकरता ग्राहकांना जलद सेवा देणे क्रमप्राप्त आहे. यावेळी सोलर एजन्सींनी मांडलेल्या विविध अडचणी तत्काळ सोडवण्याची ग्वाही स्वप्नील काटकर यांनी दिली. 

वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या सौर प्रकल्पातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण विकत घेते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. यामुळे वीजग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त घरगुती ग्राहक व गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे. 

अशी आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
 छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. 


प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकांना जलद सेवा द्यावी