बातम्या
खासबाग मैदान सारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 7/26/2023 5:53:41 PM
Share This News:
कोल्हापूर दि.२६ : खासबाग कुस्त्यांचे मैदान येथे काल घडलेली घटना अंत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील अशा पुरातन वास्तूंचे तात्काळ सर्व्हेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासह जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरणासह त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. खासबाग मैदान दुर्घटना, जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती, आपत्कालीन यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची सध्यस्थिती, त्यावर केलेल्या उपाययोजना, आपत्कालीन स्थितीतील यंत्रणा आदींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, खासबाग मैदान सारख्या दुर्घटना घडून जीवित हानी होणे दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता अशा पुरातन वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. त्यांची तात्काळ डागडूजी करावी आणि अशा वास्तूंच्या संरक्षणासाठी अभ्यासपूर्वक नव्याने आराखडा तयार करावा.
यासह सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. संभाव्य पूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आणि त्यांच्या जनावरांना विनाविलंब स्थलांतरीत करावे. स्थलांतरीत नागरिकांसाठी ठिकठिकाणी निवारा केंद्र स्थापन करण्यात यावीत त्यांच्याकरिता दररोज अल्पोपहार, जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. यासह जनावरांसाठी पशुखाद्य उपलब्ध करून देण्यात यावे. संभाव्य पूरग्रस्त गावातील गरोदर महिला, अत्यावश्यक रुग्णांना प्राधान्याने स्थलांतरीत करावे. यामध्ये कोणतीही हयगय करू नये.
नदीकाठच्या गावांसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. सी.पी.आर रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पूर ओसरल्यानंतर गावागावात औषध फवारणी करण्यात यावी. यासह ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रविकांत आडसूळ, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग आदी संबधित अधिकारी उपस्थित होते.
खासबाग मैदान सारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी : श्री.राजेश क्षीरसागर
|