बातम्या
खासबाग मैदान संवर्धनाचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री जाधव
By nisha patil - 7/28/2023 7:43:36 PM
Share This News:
कोल्हापूर : खासबाग मैदानाचे मुळ स्वरुप व इतर परिसराला कोणताही धक्का न लावता अद्यावत पध्दतीने मैदानाचे संवर्धन करण्यात यावे, असा सर्व समावेशक प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. तसेच मंगळवारच्या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भरीव शासकीय मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार करावा अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी दिली. दोन्ही प्रस्तावासाठी शासनाकडून त्वरित निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार जाधव यांनी यावेळी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले श्री शाहू खासबाग मैदान शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. मंगळवार (दि. २५) सायंकाळी खासबाग मैदानाची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत अश्विनी आनंदा यादव (रा. भोसलेवाडी) यांचा मृत्यू झाला. तर संध्या तेली ( रा. वडणगे) या जखमी झाल्या. ही घटना दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारे आहे. त्यामुळे आमदार जाधव यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
आमदार जाधव म्हणाल्या, श्री शाहू खासबाग मैदान कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. कोणत्याही ठिकाणी बसले तरी कुस्ती नीट पाहता येईल अशी व्यवस्था आहे. त्यासाठी तीन बाजूंना दगडी भिंत बांधून त्यात मातीचा भराव घातल होता. त्या मातीतील पाणी तसेच हवा जाण्यासाठी भिंतीला छिद्र ठेवले होते. मातीत जो दाब तयार होत होता, तो त्यातून निघून जाऊ शकत होता अशी माहिती मला मिळाली. पण नुतनीकरणाच्या कामात भिंतीतील छिद्रे बुजवली. त्यामुळे मातीतील पाणी व हवेचा दाब भिंतीवर येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते. त्यामुळे या घटनेची चौकशी करून जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.
खासबाग मैदानाचे मुळ स्वरुप व इतर परिसराला कोणताही धक्का न लावता अद्यावत पध्दतीने मैदानाचे संवर्धन करण्यासाठी सर्व समावेशक प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. तसेच मंगळवारच्या दुर्दैवी घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांना भरीव शासकीय मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार करावा अशी सूचना महापालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दोन्ही प्रस्तावासाठी शासनाकडून त्वरित निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विकासकामांमध्ये स्वच्छतागृहाचे नूतनीकरण या नावाखाली गेले कित्येक दिवस नाट्यगृहातील स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. या स्वच्छतागृहाचे काम त्वरित पूर्ण करून, स्वच्छतागृह खुली करावीत अशी सूचना ही आमदार जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिली. यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे आदी उपस्थित होते.
खासबाग मैदान संवर्धनाचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री जाधव
|