बातम्या
पूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
By nisha patil - 7/24/2024 11:12:12 PM
Share This News:
शहरातील पुराचा धोका प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे पूरबाधित नागरिकांसाठी सुसज्ज निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिका प्रशासनास दिल्या. निवारा केंद्रास निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
पुराची पातळी धोका पातळीकडे जात असल्याने शहरातील विविध भागांतील पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी ३१ निवारा केंद्रे महापालिकेने सज्ज केली आहेत. ही सर्व केंद्रामध्ये नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. आज सुतारवाड्यातून चित्रदुर्ग मठात आलेल्या स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी आमदार जयश्री जाधव यांनी संवाद साधला. या संकटकाळात पूरबाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगीतले व धीर दिला.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, प्रत्येक वर्षी पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित असलेल्या जागांवरती निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि तो शासनास सादर करावा. या प्रस्तावास मंजुरी मिळावी आणि निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.
पूररेषेतील नागरिकांनी घरामध्ये पाणी येण्याची वाट न पाहता निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित व्हावे आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपशहर अभियंता आर. के. पाटील आदी उपस्थित होते.
पूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
|