बातम्या
राजगुरुनगर येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करा;उपमुख्यमंत्री अजित पवार
By nisha patil - 8/31/2023 5:49:45 PM
Share This News:
पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर (ता.खेड) येथील पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजगुरुनगर (ता.खेड) येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी आमदार दिलीप मोहिते -पाटील, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते.
जनतेच्या सोयीच्या दृष्टीने राजगुरुनगर-खेड येथे तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार यापूर्वी पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव रद्द करून या जागेत नवीन पंचायत समिती कार्यालयाचे बांधकाम सुरू कण्यात आले आहे. या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय झाल्यास जनतेची सर्व कामे एकाच छताखाली होऊ शकतील. त्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यानी उर्वरित जागेची पाहणी करून योग्य प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राजगुरुनगर येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करा;उपमुख्यमंत्री अजित पवार
|