बातम्या

इचलकरंजीत नृत्य कुमुदिनी कथ्थक नृत्याविष्काराचे सादरीकरण

Presentation of Ichalkaranjit Nritya Kumudini Kathak Nritya Vishwaskara


By nisha patil - 2/11/2023 6:29:11 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी कथ्थक या शास्त्रीय नृत्यकलेच्या पारंपरिक वस्तूक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता यावा यासाठी नृत्यकुमुदिनी सादरीकरणाचा कार्यक्रम येथील चैत्राली उत्तुरकर आणि तिच्या पुणे येथील सहकारी नृत्य कलाकारांनी अत्यंत बहारदारपणे सादर केला. या सुंदर व मनोहारी कार्यक्रमाने रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला.

चैत्राली हिने आपले कथ्थक नृत्याचे प्राथमिक शिक्षण आणि विशारद ही पदवी येथील पदन्यास नृत्यकला अकादमीच्या संचालिका सौ. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले असून पुढे तिने पुण्यातील ज्येष्ठ कथ्थक गुरु, पंडिता मनीषा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य अलंकार आणि मास्टर्स इन कथ्थक पूर्ण केले आहे. आपल्या जन्मगावी शास्त्रीय नृत्य रसिकांना कथ्थक नृत्यकलेचा आस्वाद घेता यावा यासाठी उत्तुरकर परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या प्रसंगी सौ. सायली होगाडे यांचा सत्कार सौ. अंकिता आणि सौ. अर्चना उत्तुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चैत्राली उत्तुरकर हिने देवी धृपदा आणि झपताल प्रस्तुत केला. त्यानंतर सर्व कलाकारांनी महेश काळे व कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या गाये जा या गीतावर समूह नृत्याविष्कार सादर केला.याची नृत्य संरचना मधुरा आफळे यांनी केली होती. त्यानंतर उमंग हे वैविध्यपूर्ण हस्त पद संचालनयुक्त नृत्य प्रस्तुत करण्यात आले, त्याची संरचना वैष्णवी निंबाळकर यांनी केली होती. कार्यक्रमात बुंदन बूदन माटी पानी या पारंपरिक रचनेवर सर्वांनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला. त्याची नृत्य संरचना वल्लरी आपटे यांनी केली होती. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चैत्राली हिने पंडित बिंदादिन महाराज यांची पारंपारिक अष्टपदी सादर केली. त्याचबरोबर तिने संरचना केलेला तराना हा आकृतीबंध सर्व कलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकृष्णाच्या रास नृत्याचे सुंदर वर्णन करणारा रास रचे हा समूह नृत्याविष्कार सर्वांनी सादर केला. त्याची नृत्य संरचना गुरु मनिषाताई साठे यांनी केली होती. या कार्यक्रमात चैत्राली उत्तुरकर, वैष्णवी निंबाळकर, कीर्ती कुरंडे, मैथिली पुंडलिक, आयुषी डोबरिया, रेवती देशपांडे, सहिष्णुता राजाध्यक्ष, आलापी जोग व नंदिनी कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत अतुल उत्तुरकर यांनी केले तर सूत्रसंचालन कीर्ती कुरंडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास शास्त्रीय नृत्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इचलकरंजीत नृत्य कुमुदिनी कथ्थक नृत्याविष्काराचे सादरीकरण