बातम्या
प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार
By neeta - 1/2/2024 2:29:19 PM
Share This News:
कोल्हापूर दि. 01 : तासगाव, सांगली येथील 'प्रतिष्ठा फौडेशन'च्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानीत केले जाते. यावर्षीचा प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील कवी, लेखक प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना देण्यात आला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून तेहतीस वर्ष सेवा करून सध्या ते सेवानिवृत्त आहेत. मालवणी बोलीतील साहित्य लेखन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते प्रख्यात मालवणी लेखक असून त्यांचे समीक्षा व संशोधनपर साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांनी मालवणी कवितासंग्रह, कथा , नाटक व चित्रपट गीतलेखन केले आहे. त्यांचे मालवणी मुलुखातील कविता, भूक, तोफा आणि सलामी हे कवितासंग्रह आहेत. माणुसकिच्या हाकेवरचा गाव अनेक पुरस्कार प्राप्त कथासंग्रह, धरणाखालचं गाव, जागवा मनाचा जागर यासारखे नाट्यलेखन त्यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्री लोकगीते हा लोकसाहित्य संशोधनाचा पुरस्कार प्राप्त ग्रंथ लिहिला आहे.
आजवर त्यांना शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, दक्षिण मराठी साहित्य परिषद, साहित्य कलायात्री, राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार, मंगळवेढा येथील सप्तर्षी शब्दशिवार काशिबाई घुले पुरस्कार, औदुंबर येथील सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. कोल्हापूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांच्या शिक्षण सेवा कार्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.रविवार दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी तासगाव येथे जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे व खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते त्यांना साहित्य रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सिंधुदुर्गचे मालवणी लेखक म्हणून प्रा गोसावी यांचे लेखन कार्य उल्लेखनीय असेच आहे
प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार
|