बातम्या

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Prohibitory order applicable in the district till December 7


By nisha patil - 11/21/2023 9:38:35 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्यावतीने ऊसाला प्रतिटन 400 रुपये जादा दर देण्यासाठी व ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी होणारी आंदोलने, सकल मराठा समाजास ओ.बी.सी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीकरीता करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश जारी केला आहे.  

कलम 37 (1) अ ते फ :- 
 शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा लाठयाकिंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही  वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशाकिंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.                                                                     

कलम 37 (3) :-
 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे  व सभा घेणे.

  हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.          


जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू