बातम्या

आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा -निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे

Prompt action on complaints of code of conduct violations


By nisha patil - 4/19/2024 1:27:31 PM
Share This News:



कोल्हापूर, : आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींची त्या त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करण्याबरोबरच सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत पहिल्या शंभर मिनिटांच्या आत कार्यवाही करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. 

     लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, सारथीच्या अपर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, निवडणूक कालावधीत वाहनांवर करडी नजर ठेवा. चेक पोस्ट व जिल्ह्याच्या सीमेवरील तपासण्या कडक करुन एकही संशयित वाहन सुटता कामा नये. आचारसंहिता उल्लंघन व अन्य प्रकरणी त्या-त्या नियमानुसार तात्काळ कारवाई होईल, याची दक्षता घ्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनुष्यबळ नियुक्ती व अन्य आवश्यक त्या उपाययोजना करा. उमेदवार निहाय खर्च पडताळणी करा.
मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध असल्याची खात्री करा. तसेच मतदारसंघ निहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठीच्या साहित्याचे वाटप वेळेत पूर्ण करा. मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण योग्य पद्धतीने व सविस्तर घ्या.

कोणत्याही तांत्रिक कारणामुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. सक्षम ॲप व निवडणूक विभागाकडे मागणी केलेल्या दिव्यांगांना व्हील चेअर पुरवा. मतमोजणीच्या ठिकाणी सिसीटिव्ही सुरु असल्याची खात्री करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 
यावेळी पोस्टल बॅलेट पेपर, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सुविधा, स्थिर सर्व्हेक्षण पथकांचे कामकाज, वोटर इन्फर्मेशन स्लीप, मतदान व मतमोजणी प्रक्रियेची पूर्वतयारी, इव्हीएम पुर्व चाचणी, कर्मचारी प्रशिक्षण, मतदान केंद्रांवरील सुविधा, निवडणूक आयोगाला पाठविण्याचे अहवाल आदी विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सुरेश जाधव, किरण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या तयारीबाबत माहिती दिली.


आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा -निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे