बातम्या
कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली निघणार- माजी आमदार अमल महाडिक
By nisha patil - 2/16/2024 12:49:37 PM
Share This News:
कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. अनेक मिळकतींचा सातबारा अजूनही खुला असल्यामुळे मोजणी आणि इतर कामांमध्ये अडचणी येत आहेत. या सर्व मिळकतींचे सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड मध्ये रूपांतरित करण्यासाठी तसेच मोजणीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
महानगरपालिका आणि नगर भूमापन कार्यालय यांचा समन्वय साधत माजी आमदार अमल महाडिक यांनी नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील, शिरस्तेदार प्रवीण कुंभार, भूमी अभिलेख विभागाचे करवीर उपअधीक्षक किरण माने यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी ड्रोन द्वारे संबंधित वाढीव क्षेत्राची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वाढीव क्षेत्रामध्ये कसबा करवीर, कसबा बावडा, टेंबलाईवाडी, उंचगाव, उजळाईवाडी ,पाचगाव, नवे बालिंगे, मोरेवाडी, नागदेववाडी, सरनोबतवाडी, शिंगणापूर आदी गावांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मोजणीला 36 कोटी रुपये इतका खर्च येणार होता. त्यामुळे मध्यम मार्ग काढत ड्रोन द्वारे मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मोजणीसाठी अकरा कोटी 22 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची तरतूद करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली.
वाढीव क्षेत्राची मोजणी करण्यासाठीची अधिसूचना लवकरात लवकर निघण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत असे आवाहनही महाडिक यांनी केले. एकूणच गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.
कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली निघणार- माजी आमदार अमल महाडिक
|