बातम्या

ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथींना आवश्यक मदत तात्काळ पोहोचवा

Provide immediate assistance to senior citizens


By nisha patil - 7/21/2023 8:20:42 PM
Share This News:



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत निराधारांसाठीच्या विविध बैठकांचे आयोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक समिती, उसतोड कामगार मंडळ व तृतीयपंथी कल्याण व हक्क मंडळ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी संबंधित गरजूंना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तात्काळ मदत व सहाय्य देण्यासाठी उपाययोजना राबवा, अशा सूचना दिल्या. बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच ज्येष्ठ नागरिक, निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

    बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नागरिक समिती सदस्यांनी त्यांना येत असलेला अडचणी, समस्या मांडल्या. यावेळी सीपीआर मधील सेवा घेताना ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तृतीयपंथी यांना अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी आता त्यांना रांगेत उभे न राहता प्रत्यक्ष खिडकीतून केस पेपर काढता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी संबंधित विभागास तातडीने सूचना केल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांबद्दल अद्ययावत माहिती तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या मार्फत एक अर्ज भरुन जमा करण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाच्या सर्व विभागांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना, सेवा याबाबत कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिल्या.

   जिल्ह्यात जवळपास 48 हजार 500 ऊसतोड कामगार आहेत.  तसेच मोठ्या प्रमाणात  स्थलांतरीत ऊस तोड कामगार येतात. त्यांना आवश्यक सोयी  सुविधा तसेच ओळखपत्र देण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, सर्व कामगारांना 15 ऑगस्ट पूर्वी ओळखपत्र देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या शाळांमध्ये गरजेनूसार ऊसतोड कामागारांच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. ऊसतोड कामगारांबरोबर असलेल्या जनावरांचे हंगामापूर्वी लसीकरण करण्याची मोहिमही पशूसंवर्धन विभागाने तातडीने हाती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

     तृतीयपंथींबाबतच्या आढावा बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील नोंदणी व घरकूलासाठी अर्ज सादर केलेल्यांसाठी तातडीने घरकुले पुरविण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. तृतीयपंथींसाठी रोजगारासह त्यांना आवश्यक सुविधा कीट पुरविण्यासाठी काय करता येईल याबाबत समितीने पर्याय सादर करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. 

     यावेळी झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, तसेच या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या परंतु कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित व अर्थसहाय्य अदा करण्यासाठी प्राप्त प्रकरणे आणि न्यायालयात दाखल असणाऱ्या प्रकरणांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. तसेच ॲट्रोसिटी पीडितांना काही अडचण, समस्या असल्यास जिल्हा दक्षता समिती सदस्यांशी संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथींना आवश्यक मदत तात्काळ पोहोचवा