जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Provide insurance coverage to more citizens of rural areas under Jan Suruksha Abhiyan  District Magistrate Rahul Rekhawar


By nisha patil - 5/25/2023 6:30:00 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखालीदुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन कांबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विश्वजीत करंजकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी, बँकांचे जिल्हा समन्वयक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेनंतर्गत तालुकानिहाय व गावनिहाय कार्यपूर्तीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन  जनजागृती वाढवा. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्या. बचत गटातील शंभर टक्के महिलांना या मोहिमेअंतर्गत सामावून घेण्याबाबतही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळाला त्यांनी सूचना केल्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी  त्या त्या विभागांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सूचित केले.

गावांमध्ये होणाऱ्या शिबिरांपुर्वी गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात व्यापक जनजागृती करावी. बँकांनी आपल्या सर्व खातेदार व कर्जदारांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत.  या योजनेचे ऑटो नूतनीकरण दि. 25 ते 31 मे दरम्यान सुरु झाले आहे. सर्वांनी दोन्ही विमा नूतनीकरासाठी 456 रुपये रक्कम बँक खात्यात जमा राहील याची दक्षता नागरिकांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

दिनांक 1 एप्रिल ते 30 जून 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान बँकांच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेण्यात येत आहेत. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू ओढवला तर त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या या विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (अपघाती) योजनेचा केवळ 20 रुपये वार्षिक हप्ता असून ही योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (नैसर्गिक/अपघाती)योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होवू शकतात, अशी माहिती गणेश गोडसे यांनी दिली.


जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार speednewslive24#