बातम्या

जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या-जिल्हाधिकारी अमोल येडगे

Provide insurance coverage to more citizens through Jan Suruksha Abhiyan


By nisha patil - 11/26/2024 11:07:04 PM
Share This News:



जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या-जिल्हाधिकारी अमोल येडगे

 जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घेवून विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.भारत सरकारचे वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बैंकर्स समितीच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे तसेच बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचे उप विभागीय प्रबंधक श्री विशाल कुमार सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी, बँकर्स आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

   प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेनंतर्गत मागील कार्यपूर्तीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी  येडगे म्हणाले, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करा, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा. जिल्ह्यातील गरीब, गरजू कुटुंबे, सफाई कामगारांसह सर्व क्षेत्रातील कामगार व  प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्या. बचत गटातील शंभर टक्के महिलांना या मोहिमेत सामावून घेण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. यापूर्वी मयत झालेल्या खातेधारकांना या योजनांचा लाभ मिळाल्याची खात्री करुन घ्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी  त्या त्या विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी  येडगे यांनी दिल्या.


जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या-जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 43