बातम्या
सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगावी
By nisha patil - 8/9/2023 7:08:04 PM
Share This News:
कोल्हापूर परिमंडळ: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाकडून मंडपाची उभारणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, देखावे साकारताना विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगावी, असे महावितरणचे आवाहन आहे. गणेशउत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण यंत्रणा सज्ज आहे.
संभाव्य विद्युत अपघातामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्याकरीता विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सवासाठी मंडप उभारताना, विद्युत रोषणाई, देखावे साकारताना, गणेशमुर्ती आणताना विद्युत यंत्रणेतील विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर ), विद्युत खांबास ताण दिलेली तार, भुमिगत वाहिनींचे फिडर पिलर इ. पासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. विद्युत वाहिन्यांखाली मंडप उभारणी करण्यात येऊ नये. मंडपासाठी वापरण्यात येणारे लोखंडी गज, खांब उभारताना ते विद्युत वाहिन्यांच्या सपंर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विद्युत खांब, रोहित्रे, फिडर पिलर इ.वर चढून कुठलेही काम करू नये. विद्युत संच मांडणी अधिकृत कंत्राटदाराकडूनच करुन घ्यावी. मंडपातील विद्युत संच मांडणीची आर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत संच मांडणीत अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर किंवा रेसिड्युल करंट सर्किट ब्रेकर बसवावे. विद्युत भारानुसार योग्य क्षमतेच्या वायर्स वापराव्यात. वायर्सचे इन्सुलेशन खराब होऊन लोखंडी पत्र्यात वा अँगल्समध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते, याची काळजी घ्यावी. शक्यतो जोड वायर्स वापरणे टाळावे. वायर्सना जोड देण्याची गरज असल्यास योग्य क्षमतेची इन्सुलेशन टेप वापरावी. थ्री पिनचा वापर करावा. उघड्या वायर्स खोचू नये. मंडपातील स्वीचबोर्ड सुरक्षित ठिकाणी ठेवावा. त्याच्या मागील बाजूस लाकडी फळी असावी. वीजपुरवठा व जनरेटर असल्यास त्याकरीता स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. पाऊस व वादळ वाऱ्यानंतर मंडपातील विद्युतीकरण व रोषणाई हाताळताना तपासणी करून घ्यावी. गणेशमंडळांनी भाविकभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत सुरक्षेबाबत तडजोड करू नये.
महावितरणकडून सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज आकारणी करण्यात येते आहे. तेंव्हा मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह नजिकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी. विद्युत निरिक्षक यांची विद्युत संच मांडणी परवानगी आवश्यक आहे.अनाधिकृतपणे वीज वापर करणे धोकादायक व जीवघेणे ठरू शकते.महावितरणकडून विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहेत.आपात्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कोल्हापूर (7875769103) व सांगली (7875769449) कक्षाशी संपर्क साधावा. मंडळ कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 1912 /19120/ 1800-212-3435 / 1800-233-3435 हे ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगावी
|