बातम्या
अस्वस्थ शहराच्या कविता काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By nisha patil - 9/13/2023 11:57:40 AM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी कवी श्यामसुंदर मिरजकर यांची कविता १९९० च्या दशकातील यंत्रमाग व्यवसायातमधील कामगार वर्गाचे अस्वस्थ करणारे दर्शन घडविते. जागतिकीकरणाचा स्पर्श असलेली हा कविता आहे. इचलकरंजी शहरातील तत्कालीन जीवनाचे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ घेऊन आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या वर्गाचे अस्वस्थ जीवन ही कविता मुखर करते. जगासाठी वस्त्र विणणारे विणकर स्वतः मात्र अर्धनग्न आहेत, हे वास्तव मांडणारी ही कविता आहे," असे प्रतिपादन प्रा. डॉ रफीक सूरज यांनी केले.
ते कवी श्यामसुंदर मिरजकर लिखित 'अस्वस्थ शहराच्या कविता' या कवितासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, इचलकरंजी मधील मराठी विभाग व नाग-नालंदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे उपस्थित होते.
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे अधिष्ठाता कवी डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, श्यामसुंदर मिरजकर यांची तीस वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आजही तितकीच महत्त्वाची ठरते. कारण या कवितेतून आलेला आशय कालसुसंगत आहे. समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांना या कवितेने स्पर्श केला आहे. जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन माणूस व माणुसकीची प्रतिष्ठापना कवीने आपल्या कवितेतून केली आहे.
समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस कवी प्रसाद कुलकर्णी म्हणाले, श्यामसुंदर मिरजकरांची कविता कालातीत असून त्यांनी तत्कालीन परिस्थितीला प्रश्न विचारण्याचे धाडस केले आहे. आजच्या दडपशाहीच्या संभ्रमित काळात कवी-लेखकांनी योग्य भूमिका घेऊन लिहिले पाहिजे. समाजमनाची घुसळण केली पाहिजे."
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, नाईट कॉजेमधील मराठी विभागाचा माजी विद्यार्थी एक गंभीर कवी, समीक्षक म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध करतो हे कॉलेजसाठी भूषणावह असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अभिजित पाटील यांनी करून दिला. यावेळी कवी श्यामसुंदर मिरजकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कवी श्यामसुंदर मिरजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रवीण पोवार, आभार डॉ. जीवन पाटील यांनी तर सूत्रसंचलन प्रा. सौरभ पाटणकर व डॉ.सचिन चव्हाण यांनी केले. यावेळी चित्रकार प्रशीक पाटील यांचा कवितासंग्रहातील उत्कृष्ट रेखाटनाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच मनोरंजन मंडळ व आपटे वाचनालय या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून संजय होगाडे व प्रा. अशोक दास यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास कवयित्री शैलजा टिळे- मिरजकर, कवयित्री वैशाली नायकवडी, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कवी प्रा. एकनाथ पाटील, प्रा. राजा माळगी, साहित्यिक डॉ. रवींद्र श्रावस्ती, कवी रवींद्र पाटील, प्रकाशक त्र्यंबकेश्वर मिरजकर, पद्मरत्नचे संपादक दादासाहेब जगदाळे, नारायण सुर्वे काव्यमंचचे सदस्य, काव्यरसिक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अस्वस्थ शहराच्या कविता काव्यसंग्रहाचे प्रकाशन
|