बातम्या

राघवेंद्र स्वामी यांच्या 'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी'च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Publication of the Marathi commentary on Raghavendra Swamy s Shrikrishna Charitrya Manjiri by the Governor


By nisha patil - 10/7/2024 11:16:40 PM
Share This News:



श्रीक्षेत्र ' मंत्रालयम्' येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या 'श्रीकृष्णचारित्र्यमंजिरी' या लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १० जुलै) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालयम् येथील विद्यमान पिठाधिपती स्वामी सुबुधेन्द्र तीर्थ, मुंबई येथील मठाचे विश्वस्त रामकृष्ण तेरकर व अनुवादकर्ते प्रा. गुरुराज कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.    

 मंत्रालयम, आंध्र प्रदेश येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी वेद, उपनिषद, प्रभू राम चरित्र व श्री कृष्ण चरित्र यांसह विविध विषयांवर लिखाण करून वेदांचे सार सोप्या भाषेत सामान्य जनांना उपलब्ध करून दिले.

'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी' केवळ २७ श्लोकांचे संकलन असले तरीही ते श्रीमद भगवद्गीते प्रमाणे सारगर्भित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या ग्रंथावरील टीका प्रा. कुलकर्णी यांनी मराठी भाषेत आणल्यामुळे हा ग्रंथ मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. हा ग्रंथ हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवादित केला जावा तसेच त्याचे ऑडिओ बुक देखील तयार केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

श्री राघवेंद्र स्वामी यांनी ३५० वर्षांपूर्वी मंत्रालयम येथे संजीवन समाधी घेतली. आपल्या जीवनकाळात त्यांनी ४८ ग्रंथांची निर्मिती केली. रामायण व महाभारताचे सार त्यांनी लिहिले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. द्रविड देशातील भक्ती - ज्ञानाची अभिवृद्धी महाराष्ट्रात झाली, असे सांगून श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरित झाल्याबद्दल पिठाधिपती सुबुधेन्द्र तीर्थ यांनी आनंद व्यक्त केला.


राघवेंद्र स्वामी यांच्या 'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी'च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन