बातम्या
पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By nisha patil - 7/26/2023 6:02:00 PM
Share This News:
नुकतेच प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांनी आज पहाटे लुधियानाच्या DMCH रुग्णालयात वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुरिंदर हे गेले काही दिवस आजारी होते. सुरिंदर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक जण सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहात आहेत.सुरिंदर शिंदा हे पंजाबी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध गायक होते. अनेक हिट गाणी त्यांनी गायली आहेत. ‘पुत्त जट्टां दे’, ‘जट्टा जियोना मोर’, ‘काहर सिंह दी माउट’ ही पंजाबी गाणी त्यांनी गायली आहेत. तसेच सुरिंदर शिंदा हे प्रसिद्ध पंजाबी गायक कुलदीप माणक यांचे सहकारी होते. त्यांनी दिवंगत अमरसिंह चमकिला यांना संगीतक्षेत्रात नाव कमावण्यास मदत केली होती. सुरिंदर शिंदा यांनी ‘ऊंचा दर बेब नानक दा’ आणि ‘पुत्त जट्टां दे’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून देखील काम केले.
सुरिंदर शिंदा यांचे खरे नाव सुरिंदर पाल धम्मी होते. यांचा जन्म 20 मे 1954 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. आपल्या दमदार आवाजाने त्यांनी पंजाबी संगीत क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली. सुरिंदर शिंदा यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
भगवंत मान आणि सुखबीर सिंह बादल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
|