बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर

Punyashlok Ahilya Devi Holkar University Dr On Prakash Mahan


By nisha patil - 3/10/2023 3:56:14 PM
Share This News:



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी  डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली.

डॉ. प्रकाश महानवर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत. 1 जून 1967 रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सोमवारी (2 ऑक्टोबर) ते पदभार स्वीकारतील.

डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांचेकडे संबंधित पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सच‍िव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर