विशेष बातम्या
पंचगंगा लोकांचा आवाज झाल्याशिवाय शुध्दीकरण अशक्य : डॉ. राणा
By Administrator - 5/26/2023 7:51:39 AM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी दहा-बारा वर्षापूर्वीची काविळी दरम्यानची पंचगंगा नदीची स्थिती आजही जैसे-थे आहे. अतिक्रमण, प्रदूषण आणि दोहन या समस्यांनी पंचगंगा नदी ग्रस्त आहे. पूर्वी लोकांच्या हातात असलेले नदी संस्थान आज सरकार, प्रशासनाच्या हातात आहे. लोकांचे नेमलेले सरकारी विश्वस्त नदीसाठी काम करणार नसतील तर आता लोकांनी पंचसूत्री आवलंबली पाहिजे. जनसुनावणी, प्रबोधन, प्रदूषणमुक्ती, पूरमुक्ती, पर्यावरणपूरक जीवनशैली अशी पंचसूत्री नदीला अमृतवाहिनी बनविण्यासाठी असेल. या प्रत्येक घटकावर योग्य पद्धतीने काम करण्यासाठी 'जन आयोग' नेमण्याची गरज आहे. सरकारी नोकर हे सरकारच्या विरोधात जात नसतात.त्यामुळे सरकार, राजकिय आणि उद्योग यांचा दबाव नसलेला पाच जणांचा जन आयोग तयार करण्याची गरज आहे .त्याशिवाय पंचगंगेचे शुध्दीकरण होऊ शकत नाही. पंचगंगा लोकांचा आवाज झाल्याशिवाय तिच्या शुद्धीकरणाचा प्रश्न सुटू शकत नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे, असे मत थोर पर्यावरण तज्ञ जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी मध्ये इचलकरंजीतील विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्तावित आणि स्वागत केले. मंचावर संदीप चोडणकर आणि प्रताप होगाडे उपस्थित होते.यावेळी दलित पॅंथरचे शहराध्यक्ष युवराज जाधव यांच्या प्रतिमेला डॉ. राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ.राजेंद्र सिंह राणा म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून पंचगंगा नदीची स्थिती आहे तशीच आहे.हे चांगले लक्षण नाही.गेली काही वर्षे नदी आजारी आहे. सातत्याच्या दुर्लक्षामुळे नदी अति दक्षता विभागात जाईल.आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा इलाज नेहमीच अवघड असतो. याचे भान ठेवण्याची गरज आहे. नदीकाठावरील जलदिंडी,जलयात्रा पदयात्रा हे उपक्रम ठीक आहे पण लोकांचा जागर आणि लोकांचा सहभाग यातूनच नदीचे पंचगंगेचे खोरे संपन्न बनू शकते.पुढच्या पिढीला आपण बंगले, गाडी ,संपत्ती द्याल पण शुद्ध पाणी कसे देणार हा प्रश्न आहे. लोकांची जबाबदारी आणि कर्तव्य यांचे उत्तम उदाहरण असलेला भारतीय स्वातंत्र्यलढा आणि भारतीय संविधान हेच फक्त अमृततत्त्व आहे. त्यामुळे नदीला अमृतवाहिनी बनवायचे असेल तर स्थानिकांचा लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी पंचगंगेच्या प्रदूषणावर ठोस उपाय योजनेची सविस्तर भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांच्या शंकांच्या व प्रश्नांचे निरसनही केले.डॉ.राजेंद्र सिंह राणा यांच्या मांडणीपूर्वी अभिजीत पटवा, दीपक भोसले ,अरविंद धरणगुत्तीकर, अभिमन्यू करणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
समारोपामध्ये संदीप चोडणकर म्हणाले ,२०१२च्या काविळीच्या साथीमध्ये चाळीस लोक दगावले व दहा हजार लोक बाधित झाले. त्याला अकरा वर्षे होऊन गेली .तरीही त्याची जनसुनावणी आजतागायत झालेली नाही. आपण चार वर्षे नदीच नाकारली. नदीच पाणी पिणार नसू तर आपण कोणत्या तोंडाने नदीसाठी आवाज उठवणार. प्रदूषण नियंत्रणातील चुकीच्या संकल्पना राबविल्या गेल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढतच चालेल आहे. डॉ राजेंद्रसिंह राणा यांनी सांगितलेली पंचसूत्री राबवावी लागेल. तातडीने जनअयोग नेमण्याची गरज आहे. पुढच्या पिढीला त्यांची नदी आपण सुस्थितीत देऊ शकू, नदीला अमृतवाहिनी बनविण्याचा संकल्प प्रत्येकाचा झाला तरच हे शिवधनुष्य उचलणे शक्य आहे. या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Purification is impossible without the voice of Panchganga people Dr Rana speednewslive
|