राजकीय
सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा - राजेश लाटकर
By nisha patil - 11/18/2024 11:08:38 AM
Share This News:
सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा - राजेश लाटकर
बापट कॅम्प येथे महाविकास आघाडीची सभा
कोल्हापूर: कोट्यवधींचा निधी आणला असे सांगून त्या सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा असे आवाहन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. बापट कॅम्प परिसरातील कुंभार बांधवांना भेडसावणाऱ्या रॉयल्टीचा प्रश्न तसेच पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे असे ते म्हणाले. बापट कॅम्प येथील श्री संत शिरोमणी गोरा कुंभार चौकात झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी निवेदन देऊनही आजपर्यंत त्याची दखल न घेणाऱ्या विरोधी उमेदवाराला आपले बहुमोल मत देण्याऐवजी नेहमी तुमच्या मदतीला येणाऱ्या राजेश लाटकरला बहुमताने निवडून द्या. मला मत दिल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देतो असे ते पुढे म्हणाले. तुमच्या रॉयल्टीचा प्रश्न पहिल्या बैठकीत मांडून त्यावर पर्याय काढण्याचे आश्वासन मी तुम्हाला आजच देतो. दरवर्षी पुराचे पाणी येथे आणि शाहूपुरीत येत असते. त्यावेळी मी सातत्याने तुमच्या मदतीला येतो. यापुढे ही मी तुमच्या सोबत कायम असणार. राष्ट्र सेवादलाचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे माझा एकच उद्देश असेल तो म्हणजे 'नो खंडणी, नो कमिशन'. आमदार तुमच्या दारी असे माझ्या कामाचे स्वरूप असेल.
त्यामुळे खासदार शाहू महाराज, थेट पाईपलाईनचे जनक आमदार सतेज पाटील, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजेताई छत्रपती यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेल्या उमेदवारीची पश्चाताप करावा लागणार नाही, याची ग्वाही मी उपस्थित आपणा सर्वासमोर देतो. गद्दारीचा कलंक लावलेल्या या लोकप्रतिनिधीचे विविध कारनामे चौकाचौकात चवीने चर्चिले जात आहेत. यांनी सार्वजनिक निधीतून जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःचा आणि परिवाराचा विकास केला. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे त्यांनी निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून काय काय केले हे ते स्वतःच सांगू शकतील. कारण माझ्या-तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता कोटीवर आकडे किती येतात याचा विचार करून लिहावे लागतील. आपल्यासमोर असणाऱ्या वरील दोन प्रश्नांबरोबर आरोग्य, पाणी, कचऱ्याची समस्या, रस्ते अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपणाला येत्या २० तारखेला शोधायचे आहे. त्यासाठी आपले प्रामाणिक मत धनशक्तीला द्यावयाचे का, जनशक्तीला याचा विचार करा आणि विचारपूर्वक मतदान करा. यासाठी त्यांच्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर आहे, तसाच मी नगरसेवकपदाच्या कालाधीत आणि त्यानंतही महापालिकेच्या सहयोगना येथे आणि परिसरात केलेल्या कामाचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे.
त्यासाठी येत्या वीस तारखेला विचारपूर्वक मतदान करा आणि तेवीस तारखेला तुमच्या मनातील आमदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी घ्या. माझे चिन्ह प्रेशर कुकर असून प्रेशर कुकर समोरील बटण इतक्या जोराने दाबा की विरोधकांचे प्रेशर वाढले पाहिजे आणि आपला विजय सहजसोपा झाला पाहिजे. शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने भरभरून मतदान करून एका गद्दाराला गाडून राजू लाटकर या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊया. कोल्हापूर शहरावर पडलेला गद्दारीचा डाग पुसायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सामान्य कार्यकर्ता राजेश लाटकर यांना निवडून द्यावे लागेल. शहराचा शाश्वत विकास घडवयाचा असेल तर विकासकामांच्या माध्यमातून एक परिवर्तनाची संधी वाया घालवू नका. यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, संतोष रेडेकर, मारुतराव कातवारे, संतोष रेळेकर व नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा - राजेश लाटकर
|