बातम्या
भ्रष्ट मक्तेदारांचा अधिवेशनात प्रश्न मांडणार : आम.प्रकाश आवाडे
By nisha patil - 7/25/2023 12:50:25 PM
Share This News:
इचलकरंजी/प्रतिनिधी - काम न करता बोगस कागदपत्रे तयार करुन बिले आदा करण्यात आल्याप्रकरणी भ्रष्ट मक्तेदारांचा चालू पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याने मागील दहा वर्षात जी विकासकामे झाली आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळावी, अशा सूचना आमदार प्रकाश आवाडे यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शुध्द पेयजल प्रकल्प, नवीन जलकुंभांची उभारणी, कृष्णा योजना जलवाहिनी बदल आणि मैलखड्डा येथील बायोमायनिंग प्रश्नी महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकल कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार आवाडे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.
केवळ कागदपत्रो कामाची नोंद करुन प्रत्यक्षात काम न करता लाखो रुपयांची बिले आदा करण्यात आल्याची दोन प्रकरणे महापालिकेत नुकतीच उघडकीस आली आहेत. याशिवाय आणखीन काही प्रकरणे असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन यासह विविध प्रश्नांवर ऊहापोह केला. आमदार आवाडे यांनी बोगस कामांची गांभिर्याने दखल घेतली असून या संदर्भात चालू पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत. त्यासाठी महापालिकेचे मक्तेदार संजय घोडके, शैलेश पोवार, संजय मुरग्याप्पा पाटील आणि विनय राठी यांच्यासह ज्या ज्या मक्तेदारांनी मागील दहा वर्षात जी कामे केली आहेत त्याबाबतचा संपूर्ण तपशिल आणि माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आमदार आवाडे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
त्याचबरोबर आसरानगर परिसरातील मैलखड्डा येथील बायोमायनिंग संदर्भात शासनाकडून आदेश होऊनही महापालिका प्रशासन या कामात दिरंगाई करत आहे. भागातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि आंदोलनानंतरही प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने नागरिक विशेषत: महिला वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. हा प्रश्न आणखीन गंभीर स्वरुप घेण्यापूर्वी त्याची सोडवणूक करावी, असे आमदार आवाडे म्हणाले. तर चार वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शहरासाठी 100 शुध्द पेयजल प्रकल्प आवश्यक त्या निधीसह मंजूर करुन आणले आहेत. परंतु ते काम पूर्णत्वास जावू नये यासाठी काहीजणाची टोळी कार्यरत असल्याचा घणाघातही आमदार आवाडे यांनी केला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन होऊन नागरिकांना वेळच्या वेळी पाणी मिळावे म्हणून शहरात 6 नवीन जलकुंभ उभारणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यास प्रशासनाला सांगितले आहेत. परंतु त्या कामातही चालढकल केली जात असून नागरी प्रश्नांबाबत प्रशासनाला काहीच गांभिर्य नसल्याबद्दल खडे बोल सुनावले. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, डॉ. राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, चंद्रशेखर शहा, रणजित जाधव, राहुल घाट, गुंडू गोरे, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, तत्पूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे भेट दिली. शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशीन मंजूर झाले आहे. त्या संदर्भात मशीनची पाहणी करून आढावा घेतला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. नंदनकुमार बनगे, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. पोळ, डॉ. बागवान व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भ्रष्ट मक्तेदारांचा अधिवेशनात प्रश्न मांडणार : आम.प्रकाश आवाडे
|