बातम्या
बारावी-दहावीच्या प्रश्नपत्रिका 'इन कॅमेरा' परीक्षा केंद्रात जाणार!
By nisha patil - 7/2/2024 3:05:27 PM
Share This News:
बारावी-दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यावर्षी सहायक परिरक्षकांकडून प्रश्नपत्रिका 'इन कॅमेरा' परीक्षा केंद्र संचालकांकडे जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा व केंद्रांतील गैरप्रकारास आळा बसणार आहे.सध्या बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. 10 फेब-वारीपासून दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. त्यानंतर 21 फेब्रुवारीला बारावीची तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. दोन्ही परीक्षेत अनेकदा गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवूनही कॉपी प्रकरणे कमी झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने हा निर्णय घेतला आहे.बारावी-दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका सहायक परिरक्षक (रनर) कस्टोडियन यांच्याकडून घेताना त्याचे व्हिडीओ शूटिंग करणार आहेत. लोकेशनसाठी त्यांनी मोबाईलचे 'जीपीएस' सुरू ठेवायचे आहे. प्रश्नपत्रिका केंद्र संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यापासून ते कपाटात ठेवण्यापर्यंतची सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करायचे आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून अनेक ठिकाणी ओएमआर शीट डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील ईडीपी सेक्शन यांच्याकडे शाळा, हायस्कूलच्या तक्रारी, अडचणी सोडविल्या जाणार आहेत.
यावर्षी बारावी-दहावी लेखी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022 मध्ये कोरोना काळात त्या त्या शाळांमध्ये लेखी परीक्षा झाल्या, तसेच विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला. त्यामुळे गतवर्षीच्या 14 लाख 50 हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या 15 लाख 10 हजारांवर पोहोचली आहे. दहावीच्या परीक्षेला गेल्या वर्षी 16 लाख विद्यार्थी बसले होते. यंदा दहावीला 25 हजारांहून अधिक विद्यार्थी वाढले आहेत.इन कॅमेरा प्रश्नपत्रिका पाठविल्याने सर्वांवर 'वॉच' राहणार
राज्य शिक्षण मंडळाने इन कॅमेरा प्रश्नपत्रिका पाठविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका पॅकेट व्यवस्थित पाठवले जाईल. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार होणार नाहीत. तसेच इन कॅमेरा ते केंद्र संचालक यांच्याकडे दिल्याने त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. प्रश्नपत्रिकांचे पाकीट हातात दिल्यापासून ते कपाटात ठेवण्यापर्यंत त्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. यामुळे परिरक्षकापासून ते केंद्र संचालक यांच्यावर 'वॉच' राहणार आहे.
बारावी-दहावीच्या लेखी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून तयारी सुरू आहे. सर्व प्रश्नपत्रिका इन कॅमेरा पाठविण्यात येणार आहेत, जेणेकरून कोणताही गैरप्रकार घडणार नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचे 'ओएमआर' शीट डाऊनलोड करताना येणार्या अडचणीबाबत सर्व विभागीय मंडळाना सूचना दिल्या आहेत.
बारावी-दहावीच्या प्रश्नपत्रिका 'इन कॅमेरा' परीक्षा केंद्रात जाणार!
|