बातम्या

रासपचे महादेव जानकर स्वगृही परतले, शरद पवार गटाला धक्का

RSP Mahadev Jankar returns home shock to Sharad Pawar group


By nisha patil - 3/24/2024 11:15:03 PM
Share This News:



लोकसभेची एक जागा मिळणार राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महाविकास आघाडीत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र महायुतीने त्यांना एक मतदारसंघ देण्याचे मान्य करताच, ते महायुतीत परतले आहेत.

महादेव जाणकर यांनी आज महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तीन पक्षांच्या जागावाटपाच्या तिढ्यात आपल्या पक्षाला विचारले जात नसल्याची सल त्यांच्या मनात होती. त्यातच महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांचा काही दिवसांपासून मविआमध्ये जाण्याचा विचार होता. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ जानकर यांना देण्याची तयारी दर्शविली होती. यासाठी इतर पक्षांशी माझी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आज महायुतीमधील तीनही पक्षांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आता महादेव जानकर हे महायुतीबरोबरच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

‘भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही’, काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले… या विषयावर माहिती देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्वाळा दिला आहे. महायुतीकडून लोकसभेची एक जागा रासपला म्हणजेच महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योग्य वेळी मतदारसंघाचे नाव जाहीर केले जाईल.


महायुतीकडून महादेव जानकर यांना पत्र देण्यात आले. दरम्यान महादवे जानकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पुन्हा महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक लोकसभा मतदारसंघ देण्याचे आश्वासन महायुती नेत्यांनी दिले आहे. मी महाविकास आघाडीत सामील झालो नव्हतो, आमची केवळ चर्चा सुरू होती. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी महायुतीबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तीनही पक्षांचे जागावाटप जाहीर होईल, तेव्हा आमच्या जागेचाही उल्लेख केला जाईल, असे ते म्हणाले.
 

सुप्रिया सुळेंविरोधातही जानकर यांनी निवडणूक लढवली महादेव जानकर यांनी २०१४ सालच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यावेळी बारामतीमधले नसूनही जानकर यांनी तब्बल ४,५१,८४३ एवढी प्रचंड मतदान मिळवलं होतं. तर सुप्रिया सुळे यांना ५,२१,६५२ मतं मिळाली होती. विशेष म्हणजे २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य ३.३६ लाख एवढे होते. मात्र २०१४ साली जानकर यांनी कडवी लढत दिल्यामुळे मताधिक्यात मोठी घट झाली.

माढातून अडीच लाखांच्या मताधिक्याने जिंकू शकतो – जानकर विशेष म्हणजे २००९ साली महादेव जानकर यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमाकांवर होते. त्यांना ९८,७४३ एवढी मतं मिळाली होती. यावेळी
शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढातून उमेदवारी देण्याबाबत आश्वस्त केले होते. माढा हा बारामतीला लागून असलेला मतदारसंघ आहे. २००९ साली स्वतः शरद पवार माढातून निवडून आले होते. भाजपाने माढामध्ये रणजीत निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

जर महाविकास आघाडीकडून माढात उमेदवारी मिळाली तर मी अडीत लाखांच्या मतधिक्याने निवडून येऊ शकतो, असे विधान मध्यंतरी महादेव जानकर यांनी केले होते.


रासपचे महादेव जानकर स्वगृही परतले, शरद पवार गटाला धक्का