बातम्या

पावसाळा आणि विद्युत सुरक्षा

Rainfall and electrical safety


By nisha patil - 6/23/2023 7:33:12 PM
Share This News:



विद्युत सुरक्षा ही जीवन सुरक्षा आहे. जीवन हे अनमोल आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून संभाव्य अपघात टाळून जीवित वा वित्त हानी रोखणे आपल्या हाती आहे. 
                            वादळ, पाऊस या काळात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत मांडणीत भू-सपंर्कन क्षरण परिपथ विच्छेदक (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स) बसविलेले असावे. त्यामुळे विजेच्या धक्क्यापासून आपला बचाव होतो. वीजप्रवाह ताबडतोब बंद होतो. अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घरातील, दुकानातील स्विच बोर्ड  व विद्युत उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. विद्युत मांडणीतील वायरिंग ठिकठिकाणी जोड असलेली नसावी, ती ओलाव्यापासून, घराच्या, शेडच्या पत्र्यापासून वा लोखंडी अँगल्सपासून सुरक्षित असल्याचे तपासावे. कधीही ओल्या हातांनी विद्युत उपकरणे हाताळू नयेत. विजेवरील उपकरणे हाताळताना नेहमी विद्युत पुरवठा बंद करावा. पायात रबरी चप्पल वा बुट घालावा. विद्युत पुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्यास, कमी दाबाचा होत असल्यास विद्युत उपकरणे बंद करून ठेवावे. तत्काळ महावितरणशी संपर्क साधावा. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनाधिकृत व अप्रशिक्षित व्यक्तिंकडून महावितरण विद्युत यंत्रणेतील कोणतेही काम करून घेऊ  नये. ते धोकादायक व जीवघेणे ठरू शकते. 
                         विद्युत खांबाला व ताणाला गुरे, जनावरे बांधू नयेत. विद्युत वाहिन्यांखाली गोठे, घराचे बांधकाम करू नये. कडब्याची गंजी उभारु नये. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, विजेच्या मिटरबाबत विशेष दक्षता घ्यावी. पुरस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांशी संपर्क साधून शेतातील विद्युतपंप, वीज मिटर वा इतर उपकरणे सुरक्षित स्थळी हलवावीत. शेतकऱ्यांनी पाऊस सुरू असताना विद्युत पंप चालू वा बंद करणे टाळावे. ओल्या हातांनी विद्युत पंप चालू वा बंद करू नये. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी शेतीची कामे शक्यतो टाळावीत.वादळ वारा वा पावसामुळे विद्युत वाहिनींवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे, विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब वाकणे वा पडणे, वितरण रोहित्र (डिपी स्ट्रक्चर )वाकणे वा पडणे असे प्रकार घडतात. विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. पावसाळ्यात कुठेही विजेच्या तारा तुटून पडलेल्या असल्यास, विद्युत खांब, ताणाची तार, रोहित्र उन्मळून पडले, वाकले असल्यास त्याला हात लावू नये. ते धोकादायक ठरू शकते. त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने महावितरणला कळवावे. एखाद्यास वीजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तिस स्पर्श न करता त्यास कोरड्या लाकडाने बाजुला करावे, त्वरित कृत्रीम श्वास देत रूग्णालयात घेऊन जावे.
                     विद्युत यंत्रणेतील वीज खांब वाकणे/ पडणे, वीज तारा तुटणे, रोहित्रे जळणे, पडणे यासह विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912, 19120, 1800-233-3435 व 1800-212-3435 या 24 तास सेवेत असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. वीजपुरवठा खंडित झाल्यास 5 ते 10 मिनिटे थांबून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. विद्युत पुरवठा खंडितची तक्रार नोंद करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या महावितरणकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा.
                                आपातकालीन प्रसंगाकरीता आपल्या कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक नोंदवून ठेवावेत. मोबाईल पुरेसे चार्ज करून ठेवावेत. घरातील वीजेवरील बॅटऱ्या व उपकरणे पुरेसे चार्ज करून ठेवावेत. नैसर्गिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे. बंद पडलेला वीजपुरवठा सुरळीत करणे या कर्तव्यभावनेतून वीज कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू असते. बिघाड नेमका कोठे झाला आहे. ही माहिती आपणाकडे असल्यास महावितरणला संपर्क करावा. जेणेकरुन तातडीने बिघाड दुरूस्ती करुन बाधित वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्यास मदत होईल. 


पावसाळा आणि विद्युत सुरक्षा