आजवरच्या पुरस्कारांत राजर्षी शाहू पुरस्कार मोलाचा- डॉ. अभय बंग
By nisha patil - 6/27/2023 12:59:13 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : आदिवासी, ग्रामीण लोकांसाठी काम करत डॉ. बंग यांचे मोलाचे सामाजिक कार्य : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचं वैभव जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील:पालकमंत्री दीपक केसरकर
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट च्या वतीने 37 वा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांना शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, महिलांसाठी शिक्षण, सामाजिक समता, शिक्षणासाठी सुविधा, शेतीच्या विकासासाठी पाण्याची सोय आदी महत्वपूर्ण कार्य केले. समाजाला चांगल्या पद्धतीने बदलण्याचा चमत्कार घडवून राजर्षी शाहू महाराजांचे विचार जोपासण्याचे काम डॉ.अभय बंग यांनी केले आहे.शाहू महाराजांच्या नावानं देण्यात येणारा शाहू पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट समजला जात असून वैद्यकीय क्षेत्रातील थोर समाजसेवक डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांना देण्यात येत आहे. दारुबंदी, तंबाखू मुक्ती यांसह वैद्यकीय क्षेत्रासाठी व आदिवासी समाजासाठी डॉ. अभय बंग यांनी केलेलं कार्य मोलाचं आहे, अशा शब्दांत पालकमंत्री केसरकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शाहू जयंतीदिनी देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना देण्यात आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बंग यांच्या सामाजिक शोधग्राम कार्याचा शाहू महाराज छत्रपती यांनी गौरव केला. आदिवासी, ग्रामीण लोकांसाठी काम करत डॉ. बंग यांनी मोलाचे सामाजिक कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अभय बंग म्हणाले, 'महात्मा गांधीजींच्या विचारांनी भावाने शेतीच्या विकासासाठी तर आपण खेड्यातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी काम सुरु केले. आदिवासी व्यक्तींना आम्ही जवळ करण्यापेक्षा त्यांनीच आम्हाला जवळ केलं, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करता आलं,' असे सांगून प्रत्येकाला आपलं आरोग्य सांभाळता आलं पाहिजे, यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले.आजवर मिळालेल्या सर्व पुरस्कारांमध्ये आजचा पुरस्कार आम्हा दोघांसाठी मोलाच आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय पाटील, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते.
आजवरच्या पुरस्कारांत राजर्षी शाहू पुरस्कार मोलाचा- डॉ. अभय बंग
|